त्र्यंबकेश्वर : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दि. ११ एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यूत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.गत महिन्यातील होळीपासून ते रविवार (४ एप्रिल)पर्यंत आठ दिवस शहरवासीयांच्या वतीने संपूर्ण गावाच्या संमतीने उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गावातील अत्यावश्यक सेवा वगळता, संपूर्ण गावात बंदमुळे शुकशुकाट पसरला होता.
गावातील कोविडच्या परिस्थितीत या बंदमुळे अंशतः फरक पडला असल्याने आणि कोविडचा प्रादुर्भाव वाढु नये, म्हणून पालिका सभागृहात नगरसेवक व्यापारी असोसिएशन कापड बाजार संघटना व नागरिकांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील परिस्थितीचा आढावा घेतला असता. पुनश्च जनता कर्फ्यूत वाढ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला, असे नगरपरिषदेतर्फे घोषित करण्यात आले.
कोविडची आजची परिस्थिती पाहता, त्र्यंबकेश्वर शहरात १९६ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, तर जिल्हा परिषद (रुरल) ५४ रुग्ण आहेत. तालुक्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह ९३९ तर आजच्या एकाच दिवसात २१ रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. न.प.हद्दीत आतापर्यंत ४६३ तर ग्रामीण हद्दीत ४७६ आतापर्यंत ६७२ कोरोनामुक्त झाले आहेत.