त्र्यंबकेश्वर : अंजनेरी येथे अभ्यास सहलीसाठी गेलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कॉलेज आॅफ आर्किटेक्चर अॅण्ड सेंटर फॉर डिझाइन महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याचा अंजनेरीच्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली़ दरम्यान, त्याच्यासमवेत असलेल्या दुसऱ्या विद्यार्थ्याचा जीव वाचविण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले असून, त्याच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ मयत विद्यार्थ्याचे नाव प्रथमेश गजानन पांचाळ असे असून, तो मुंबई येथील रहिवासी आहे़गंगापूररोडवरील वास्तुविशारद महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याची अभ्याससहल बुधवारी सकाळी अंजनेरी येथे गेली होती़ दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास प्रथमेश गजानन पांचाळ (२०, रा़ वरळी, मुंबई, सध्या आर्किटेक्ट कॉलेजमागे, गंगापूररोड) व गौरव वामन पेडणेकर (रा़ मुंबई) हे दोघे तलावाजवळ गेले़ या दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडून गटांगळ्या खाऊ लागले़ तेथे मासेमारी करणाऱ्या तरुणांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी गौरव पेडणेकरला पाण्याबाहेर काढले, मात्र प्रथमेश पांचाळ पाण्यात बुडाला होता़.यानंतर स्थानिक तरुणांनी १०८ नंबरला फोन केला असता डॉ़ सुनील व चालक घोटे हे घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी पाण्याबाहेर काढलेल्या पेडणेकरच्या पोटातील पाणी बाहेर काढून उपचारासाठी दाखल केले़ गणेशगाव येथील देवीदास ठमके, अरुण गांगुर्डे, सचिन लिलके, रघुनाथ ठमके यांनी पाण्यात शोध घेऊन प्रथमेशचा मृतदेह बाहेर काढला़ दरम्यान, त्र्यंबकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार दिलीप वाजे, विजय कोरडे हे घटनास्थळी पोहोचले व मृतदेहाचा पंचनामा केला़ या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)
त्र्यंबकला विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू
By admin | Published: June 17, 2015 11:06 PM