त्र्यंबकेश्वर : कलही तिर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना। आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्ती सी मार्जन केले असे।। एकार्नव झाला ततरंगु बुडाला तैसा देह झाला एकरुप। बाप रखमादेवीवरु विठ्ठले नवल केले करु हरविले मृगजळ।।संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या चरणी लीन होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वरकडे दिंडीच्या माध्यमातून मार्गक्रमण करत आहेत. त्र्यंबकेश्वरकडे जाणारे सर्व रस्ते हरिनाम व टाळ मृदगांच्या गजराने दुमदुमून गेले आहेत.यावर्षी निवडणुकीमुळे जि. प., पं. स. व पदवीधर मतदारसंघाची आचार संहिता शहरात लागू झाली असून, पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते समाधीची महापूजा होणार आहे. निवृत्तिनाथांच्या ओढीने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून निघालेल्या सर्व दिंड्या दशमीला त्र्यंबकमध्ये दाखल होतील. पालिकेने वाहनतळाची जागा ताब्यात घेतली असून, मात्र त्या ठिकाणी यात्रा पटांगण सुरू करून पालिकेने दोन लाख ६५ हजार रुपये रहाट पाळणे वगैरच्या माध्यमातून कमविले आहेत. अभंग होऊन दिंडीकरी आपापल्या फडावर जातात. दिंडीवाल्यांचा जागा ठरलेल्या असतात. ब्रह्मा व्हॅली येथे जामखेड्याचे कृष्णाजी महाराज यांच्या दिंडीचा तळ पडला असून, रविवारी (दि.२२) दशमीला दिंडीचे रिंगण होईल. गत वर्षापासून राजाराम पानगव्हाणे यांच्या शैक्षणिक संकुलात कृष्णाजी महाराज जामखेडकर यांचे रिंगण होते. यात्रेतील भाविकांचे ते एक मोठे आकर्षण आहे. रविवारी (दि. २२) संपूर्ण त्र्यंबकनगरी, हॉटेल, विविध खेळ, विद्युत पाळणे आदिंवर चढविलेल्या विद्युत रोषणाईने व ध्वनिक्षेपकावरील गीतांनी दुमदुमणार आहे. (वार्ताहर)
निवृत्तिनाथांच्या ओढीने त्र्यंबकनगरी भाविकांनी फुलली
By admin | Published: January 22, 2017 12:29 AM