त्र्यंबकेश्वर : रविवार आणि सोमवार या दोनदिवसात ब्रह्मगिरी परिक्रमा (फेरी) साठी देशभरातून सुमारे ५ लाख भाविक त्र्यंबकेश्वरला हजेरी लावतील असा अंदाज पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. या भाविकांच्या सोयीसाठी नगरपरिषद व पोलीस प्रशासन, परिवहन विभाग, ग्रामीण रुग्णालय, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट सज्ज झाल्या आहेत.तिसऱ्या श्रावण सोमवारी गर्दी होत असते. त्यादृष्टीनेच विविध यंत्रणांनी आपापल्या विभागाकडे असलेल्या कामांची तयारी पूर्ण केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ४ डिवायएसपी, १७ पोलीस निरीक्षक, ५५ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ६०० पोलस कर्मचारी व १०० महिला पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दल ४०० व १५० महिला गृहरक्षक आदिंचा भक्कम बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा सर्व फौजफाटा त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तिर्थ, निवृत्तीनाथ मंदिर, परिक्रमामार्गावर जागोजाग बंदोबस्त लावण्यात आला आहे.परिवहन महामंडळाच्या बसेस रोजच्या २५० गाड्यांपैकी नव्याने नाशिकरोड, सटाणा, येवला, इगतपुरी आदि आगाराच्या गाड्या मिनिटाला १ गाडी (जादा) धावणार आहे. तसेच रविवार सोमवार व मंगळवार या तीन दिवसात बसस्थानक गावातून स्थलांतर होऊन जव्हार फाट्यावर कार्यरत असेल. तसेच आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. फिरते पथक, परिक्रमावाटेवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. वेळप्रसंगी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका, रुग्णालयाच्या नियमित रुग्णवाहिका आदी सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत.
तिसऱ्या श्रावण सोमवारसाठी त्र्यंबकेश्वरनगरी सज्ज
By admin | Published: August 21, 2016 1:27 AM