नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्र्यंबकेश्वर व पेठ तालुका संचालक पदाची निवड अविरोध झाल्यानंतर काल (दि.२०) बागलाणमधून संदीप सोनवणे यांनी माघार घेतल्याने विद्यमान संचालक शिवाजी रौंदळ यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची अविरोध निवड झाली आहे.दरम्यान, कालच गंगापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये भटक्या विमुक्त जमाती (एन.टी.) गटातून संचालक पदासाठी निवडणूक अविरोध होण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत १७ पैकी सात उमेदवारांनी वरिष्ठ नेत्यांकडे माघारी अर्ज दिलेले असले तरी या गटाची निवडणूक अटळ मानली जात आहे.बागलाण तालुका संचालक पदाची निवड बिनविरोध करण्यासाठी काल (दि.२०) जिल्हा मजूर संघाच्या सभागृहात शिवाजी रौंदळ, दिलीप पाटील, संदीप सोनवणे यांच्यासह बागलाणमधील इच्छुक व मतदार उपस्थित होते. त्यावेळी संदीप सोनवणे व शिवाजी रौंदळ या दोघांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने सोनवणे यांनी माघार घेण्यासाठी दिलीप पाटील यांनी त्यांचे मन वळविले. त्यानंतर संदीप सोनवणे यांनी माघार घेतल्याने बागलाण तालुका संचालक पदासाठी शिवाजी रौंदळ यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष छबू नागरे, माजी नगरसेवक पुंजाराम गामणे या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत भटक्या विमुक्त जमाती गटासाठी निवड अविरोध करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रमुख दावेदारी सांगणारे शशिकांत (पिंटू) आव्हाड, आप्पासाहेब दराडे, बाळासाहेब सोेनवणे, अशोक कुमावत, म्हसू कापसे यांनी त्यांच्या उमेदवारी मागील भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर उमेदवार ठरविण्याचे अधिकार कोंडाजी आव्हाड व नरेंद्र दराडे यांना देण्यात आले. बैठकीस सुनील आव्हाड, अजय दराडे, संजय आव्हाड, गणपत हाडपे, बाळासाहेब सोनवणे, चंद्रशेखर देवकर, अशोक नागरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
त्र्यंबक, पेठ पाठोपाठ बागलाणही अविरोध
By admin | Published: February 20, 2016 10:29 PM