विहितगाव पुलाची दुरुस्तीची मागणी
नाशिक: देवळालीगाव-विहितगावाला जोडणाऱ्या वालदेवी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. जुना आणि नवा असे दोन समांतर पूल असून देवळाली गावाकडून जाणाऱ्या पुलाच्या सुरुवातीला असलेल्या उंचवट्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. पुलाचे सुशोभिकरण तसेच दुरुस्तीचे काम करण्याची नागरिकांची मागणी आहे.
धन्वंतरी महाविद्यालयात योग दिन
नाशिक: कामटवाडे येथील धन्वंतरी मेडिकल कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सरोज धुमणे पाटील उपस्थित होत्या. योग प्रशिक्षक शीतल देशमुख यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व आणि त्याची अभ्यासात होणारी मदत याविषयी मार्गदर्शन केले.
व्यवसाय शिक्षक महासंघाचे उपोेषण
नाशिक: व्यवसाय शिक्षकांना देण्यात येणारे मानधन हे गेल्या दहा महिन्यांपासून दिले गेलेले नाही. समग्र शिक्षा अभियान यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे व्यवसाय शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्रयस्थ संस्था आणि व्यवसाय शिक्षण यामुळे शिक्षक आर्थिक अडचणीत असल्यामुळे यातून तोडगा काढण्यासाठी येत्या २८ रोजी मुंबईत आझाद मैदान येथे उपोेषण करण्यात येणार असल्याचे व्यवसाय शिक्षक महासंघाने कळविले आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक अडचणीत
नाशिक: एस.टी. महामंडळातील नियमित कर्मचारीच नव्हे तर सेवानिवृत्त कर्मचारी देखील आर्थिक अडचणीत सापडले आहेत. निवृत्तीनंतरही या कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम तसेच रजेची रक्कमही मिळालेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून कर्मचारी आपल्या हक्काच्या पैशांसाठी महामंडळाकडे मागणी करीत आहे. मात्र त्यांना दाद दिली जात नाही.
उद्यानांबाबतची संभ्रमावस्था कायम
नाशिक: कोरोनाच्या निर्बंधामुळे सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आलेली आहेत. जॉगिंग ट्रॅक सकाळच्या वेळेसाठी खुली करण्यात आले आहे. त्यामुळे उद्याने देखील सुरू आहेत. मात्र काही भागातील उद्याने निर्बंधाची कारणे सांगून बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे उद्यानांना परवानगी आहे किंवा नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था दिसते.