नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट सुरू असून, बुधवारी (दि. २८) एकूण केवळ ७० बाधित आढळून आले. त्या तुलनेत तिपटीहून अधिक म्हणजे २२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, शहरात एकही मृत्यू नसून नाशिक ग्रामीणला ३ बळींची नोंद झाली आहे.
बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या अधिक राहिल्याने एकूण उपचारार्थी रुग्णांच्या संख्येतही घट येऊन ती संख्या १०६६ वर पोहोचली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण सरासरी ९७.६२ टक्के आहे. बुधवारच्या तीन बळींमुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,५०४ वर पोहोचली आहे. मात्र, प्रलंबित अहवालांची संख्या अद्यापही १,६७५ असून, त्यात नाशिक ग्रामीणचे १२९१, नाशिक मनपा क्षेत्रातील १९३ तर मालेगाव मनपाचे १९१ अहवाल प्रलंबित आहेत.