लासलगाव : लासलगाव-विंचूर रस्त्यावरील ॲक्सिस बँकेच्या समोर मंगळवारी (दि. १४) रात्री साडेअकरा वाजता दुचाकी आणि कांद्याने भरलेला ट्रक यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर पुन्हा याच ठिकाणी अपघातग्रस्त ट्रकजवळ बुधवारी (दि. १५) विटांनी भरलेला ट्रॅक्टर आणि टँकर यांच्यात दुपारी दोन वाजेच्या सुमारास जोरदार अपघात होऊन पाच मजूर जखमी झाले आहेत. सायंकाळपर्यंत लासलगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झालेली नव्हती.
दि. १४ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास लासलगावहून विंचूरच्या दिशेने कांद्याने भरलेला ट्रक (क्रमांक डब्ल्यूबी ४९-४४९१) व समोरून विंचूर बाजूकडून लासलगावकडे येणारी दुचाकी (क्रमांक एमएच १५ डीए.७२५३) यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वार संजय लुंकड हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले मात्र उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. १५) विटांनी भरलेला ट्रॅक्टर आणि टँकर यांच्यात दुपारी दीड वाजेच्या सुमारास अपघात होऊन पाच मजूर जखमी झाले आहेत.
मंगळवारी रात्री झालेल्या अपघातातील ट्रक हा रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. दरम्यान, बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या टँकरचा विटाने भरलेल्या ट्रॅक्टरला कट लागल्याने ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटला. ट्रॅक्टरच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे विटाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या ट्रॉलीवर बसलेले पाच मजूर जखमी झाले. दरम्यान, मंगळवारी झालेल्या अपघाताबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक देवीदास लाड करत आहेत.
इन्फो
घटना सीसीटीव्हीत कैद
सदर घटना जवळच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. पण हा अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी रस्त्याच्या कडेला लावल्यानंतर तो तातडीने हलवणे गरजेचे होते. याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे तर त्याची जबाबदारी लासलगाव पोलिसांनी घेतली असती का, असा प्रश्न आता यानिमित्ताने उभा राहिला आहे.