नाशिक : इगतपुरी कसारा घाटात आज पहाटे प्रवासी साखर झोपेत असताना मुबंईहून गोरखपुरला जाणारी अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्सप्रेसचे ( डाउन मार्गावरील) पहाटे चार वाजेच्या दरम्यान कसारा घाट माथ्याच्या वळणावर भीमा 2 पुलावर या गाडीच्या एका डब्याचे रुळावर चाक घसरल्याने मोठी दुर्घटना टळली. मोठा अपघात झाला असता तर जवळपास 100 ते 150 फूट खोल डब्बे खाली पडता पाडता वाचले. या बाबत रेल्वे प्रशासनाला या अपघाताबाबत माहीती विचारली असता किरकोळ अपघात असल्याची माहीती दिली. तर पहाटे चार वाजल्यापासुन प्रवासी येथे अडकले असून रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुविधा पुरवली नसल्याने प्रवाशीनी संताप व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की आज पहाटे मुंबई वरून गोरखपूरला जाणारी हमसफर एक्सप्रेस कसारा सोडल्यानंतर घाटात असलेल्या ब्रिटिशकालीन भीमा 2 पुलावर पहाटे 3:50 वाजता वळणावर मागुन इंजिन पासून दुसरा डबा रुळावरून घसरत आल्याने भीमा टू पुलावर मोठा आवाज आल्याने चालकाच्या लक्षात येताच गाडी थाबवली यामुळे सर्वात मोठी दुर्घटना टळली. मात्र जर पुलावरून डबा खाली पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. पहाटेपासून गाडी पुलावर उभी असल्याने प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत आहे.
यावेळी रेल्वे प्रशासनाने डाउन मार्गावरून येणाऱ्या सर्व गाड्या अप मार्गाने वळविण्यात आल्या असून गाडी पुलावरून बाजूला करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मुंबईहून येणारी मुंबई गोरखपुर अंत्योदय एक्सप्रेसचा एक डबा कसारा घाटात घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतुक सध्या तरी विस्कळीत झाली आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र कसाऱ्या पुढील वाहतूक सध्या तरी ठप्प झाली आहे.