नाशिक : अगोदरच ऊन-पावसाच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झालेले असताना, महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता शहरात अघोषित भारनियमन सुरू केले असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर सुरू झालेल्या या भारनियमनाने सर्वसामान्य नागरिकांची दैनंदिन कामेही ठप्प झाली असून, पाणीपुरवठा, स्वयंपाकघरातील कामे, मुलांच्या परीक्षा या साºया अडचणींना गृहिणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.विजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी शहरी भागात सहा तास ते शहरालगतच्या ग्रामीण भागात आठ ते दहा तास भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वीज नसल्याने सकाळी पाणीपुरवठा ठप्प होत असून, विजेअभावी मिक्सर, ओव्हन चालत नसल्याने स्वयंपाक करताना महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही शाळांच्या परीक्षा दिवाळीनंतर असल्या तरी काही शाळांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. त्यामुळे परीक्षा सुरू असणाºया विद्यार्थ्यांना वीज, पंख्यांअभावी अभ्यास करणे कठीण झाले आहे. दवाखाने, आॅफिसेस, कंपन्यांमध्येही यामुळे कामे ठप्प झाली असून, अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळी जवळ आली असल्याने शहरातील कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने, गिरण्या, बॅँका आदी ठिकाणी विविध कामांसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र विजेअभावी कामे ठप्प झाल्याने पैसा, वेळेचा अपव्यय होत असल्याने त्यांच्याकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
अघोषित भारनियमनाचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:39 AM