नाशिक : शहरातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, सोमवारी (दि.१) एकूण आठ रुग्ण आढळले, तर वडाळा येथील ट्रकचालकाचा यवतमाळ येथे मृत्यू झाला आहे. त्याची नोंद नाशिक शहरात करण्यात आल्याने आत्तापर्यंत कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या दहा झाली आहे. या मृत्यू झालेल्या बाधिताच्या संपर्कात कोण कोण होते, त्याची माहिती संकलित केली जात आहे, तर दुसरीकडे शहरात आढळलेल्या आठ बाधितांमध्ये बीडी कामगार वसाहत आणि डिसूझा कॉलनी येथे नवे रुग्ण आढळले आहेत.शहरात बाधितांची संख्या वाढतानाच मृत्यू पावणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. अशा बहुतांश रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर अहवाल मिळाले आहेत. सोमवारी (दि.१) वडाळा येथील एका व्यक्तीचा यवतमाळ येथे कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाला कळविली आहे. त्यामुळे महापालिका यंत्रणेने त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती संकलित करणे सुरू केले आहे.वडाळा हा परिसर आधीच हॉटस्पॉट ठरला आहे. त्यात या भागातील एका इसमाचा यवतमाळ येथे कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. याशिवाय शहरात एकूण आठ बाधित आढळले. त्यात डिसूझा कॉलनी येथील एका ३२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून, त्याला फार त्रास होत नसल्याने या रुग्णाच्या घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत.पंचवटीतील बीडी कामगारनगर येथील एका ५७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदरचा रुग्ण हा किराणा दुकानदार असून, त्याला कसा काय संसर्ग झाला याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र नंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दुसरीकडे सातपूर येथील वृंदावननगर येथे एका कुटुंबातील एकूण चार जणांना लागण झाली आहे. वीज कर्मचारी असलेल्या रुग्णाला आणि त्याच्या पत्नीला त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती.कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते, आता त्यांच्या कुटुंबातील ६१ वर्षीय वृद्धा आणि २१ वर्षीय युवतीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. पंचवटीत मार्केट यार्ड कनेक्शन महागात पडत असून, सोमवारी (दि. १) मधुबन कॉलनी परिसरातील एक १९ वर्षीय युवक, चाळीस वर्षांचा पुरुष आणि ३८ वर्षांची महिला अशा तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.दरम्यान, वडाळा येथील हा यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे मालट्रक घेवून सामान पोहचविण्यासाठी गेला होता. तिकडून परत येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्याला त्रास होत असल्याने त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे------------------------सौम्य लक्षणे असणाऱ्यांवर घरीच उपचाराज्य शासनाचे मुख्य सचिव अजेय मेहता यांनी सोमवारी (दि.१) सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोरोनाची सौम्य लक्षणे असणाºया तसेच मधुमेह आणि हृदयरोग नसणाºयांवर घरीच उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित रुग्णास काहीच त्रास होत नसेल तर त्यावर घरीच उपचार करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी सांगितले.४शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २२२ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने दोन दिवसांपूर्वी कमी झालेली प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढत आहे. सोमवारी एकूण ५३ प्रतिबंधित क्षेत्र झाले आहेत. शहरातील बाधितांची संख्या वाढत असली तरी २२२ पैकी एकूण १३१ जण कोरोनामुक्त झाले असून, सध्या ८१ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
ट्रकचालकाचा यवतमाळमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 10:22 PM