नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधामजवळील बळी मंदीर चौफूलीवरून जोड रस्त्यावरून ट्रक व दुचाकी सोबत वळण घेत असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीचालक ट्रकच्या चाकांखाली गुरूवारी (दि.१७) सकाळी सापडला. यावेळी दुचालकाच्या पाठीमागे बसलेल्या युवतीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आडगावच्या दिशेने प्रफुल्ल चंद्रशेखर खैरनार (२२,रा. साक्री) हे दुचाकीने (एम.एच १५ जीएन२४३३) बहीण शुभांगी चंद्रशेखर खैरनार (२७)सोबत द्वारकेकडे होते. यावेळी महामार्गावरून द्वारके च्या दिशेने येणाऱ्या आयशरट्रकने (एम.एच १५ ईजी७४९९) बळीमंदीर चौफुलीवरून डावीकडे औरंगाबाद महामार्गाला जोडणाºया रिंगरोडवर वळण घेतले. दरम्यान त्याचवेळी दुचाकीचालक खैरनार यांनीदेखील समांतर रस्त्यावर येण्यासाठी दुचाकी वळविली. यावेळी ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने खैरनार यांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत प्रफूल्ल यांनी परिधान केलेल्या हेल्मेटचा अक्षरश: भूगा झाला; मात्र दैव बलवत्तर असल्याने त्यांचे प्राण वाचले; दुर्दैवाने त्यांची बहीण गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडली. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी जमली. तत्काळ जखमी प्रफुल्ल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नागरिकांच्या मदतीने हलविण्यात आले. चौफूलीवर वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांचा मोठा लवाजमा होता; कारण संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा दौरा असल्याने महामार्गावर नेहमीपेक्षा अधिक वाहतूक पोलीस होते. तरीदेखील ट्रकचालकाने वळण घेता निष्काळजीपणा दाखवून भरधाव वेगाने वाहन दामटविण्याचा प्रयत्न केला; मात्र ही बाब पोलिसांच्या लक्षात यावेळी आली नाही. परिणामी दुचाकीवरुन जाणा-या भावाने बहीणीला गमावले तर तोदेखील गंभीर जखमी झाला आहे. आडगाव पोलिसांनी संशयित ट्रकचालक जगसलाल धनसर पालला (५१,रा. देवासनाका, इंदुर) ताब्यात घेतले आहे.
ट्रकची धडक : हेल्मेटमुळे दुचाकीचालक भाऊ वाचला; बहीण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 5:59 PM
या धडकेत प्रफूल्ल यांनी परिधान केलेल्या हेल्मेटचा अक्षरश: भूगा झाला; मात्र दैव बलवत्तर असल्याने त्यांचे प्राण वाचले; दुर्दैवाने त्यांची बहीण गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडली.
ठळक मुद्देट्रकचालक जगसलाल धनसर पाल ताब्यात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा दौरा