याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मागील काही दिवसांपूर्वी असाच प्रकार औरंगाबाद रोडवर घडला होता. दिंडोरी येथील मद्य कारखान्यातून निघालेला ट्रक अशाच पद्धतीने मद्यसाठ्यासह गायब करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून ट्रक शोधून काढत दोघांना ताब्यातही घेतले होते. मुंबईनाका पोलिसांनाही अशा महामार्ग लूट करणाऱ्या चोरट्यांनी आव्हान दिले आहे. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ कोटी ३८ लाख ३८ हजार ६१० रुपयाचा मद्यसाठ्यासह ट्रक (एम.एच ४८ बीएम १६१०) लंपास केला. चोरट्यांनी या ट्रकचे चालक फिर्यादी जगदीश संपत बोरकर (३७, रा. विल्होळी) यांना मारहाण करीत बळजबरीने ट्रकमध्ये डांबल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. चोरट्यांनी या जबरी लुटीत पाच लाखाच्या ट्रकसह सव्वाकोटीचा मद्यसाठा लांबविला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी अज्ञात लुटारुंविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.
महामार्गावरून मालवाहतूक करणेदेखील सुरक्षित राहिले नसल्याने ट्रकचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिक शहर-ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सर्रासपणे ट्रक चोरट्यांकडून लुटले जात असून महामार्गावर दक्षपणे रात्रीच्या सुमारास पोलीस गस्त घालण्याची मागणी होत आहे.