इंदिरानगर : अहमदनगर गौण खनिज अधिकारी यांच्या पथकाने लेखानगरसमोरील मोकळ्या जागेत गौण खनिज चोरीप्रकरणी केलेल्या कारवाईनंतर सहा दिवसांनंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात संबंधित ट्रकमालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार (दि १६) रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्हा गौण खनिज अधिकारी अहमदनगर यांच्या भरारी पथकाने लेखानगरसमोरील मोकळ्या जागेत छापा टाकून वाळूने भरलेल्या नऊ ट्रक्सवर कारवाई केली होती. गुजरात राज्यातून वाळूने भरलेले ट्रक्स नाशिकमध्ये येत असल्याची माहिती नगरच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पहाटेच्या नाशिकमध्ये पोहोचलेल्या पथकाने लेखानगर भागात सापळा रचून कारवाई केली होती. तत्पूर्वी पथकाने नाशिकचे तहसीलदार अनिल दौंड व मंडळ अधिकारी प्रशांत कांबळे, तलाठी वसंत धुमसे यांना माहिती दिली होती. भरारी पथकाने दीड ब्रास वाळूने भरलेले नऊ ट्रक ताब्यात घेतले होते. मंडलाधिकारी प्रशांत कांबळे पावती करून ट्रक ताब्यात घेत होते. संबंधित मालकांना वाळू कुठून आणली आहे व विक्री परवानाबाबत विचारणा केली असता त्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाही. तसेच विक्री परवाना आढळून आला नाही म्हणून गौण खजिन चोरीप्रकरणी तलाठी संजय कापडणीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वाळूचोरी प्रकरणी ट्रकमालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:11 AM