नाशिक : नाशिक औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनल विकसित करण्याबाबत राखीव भूखंडावरच ट्रक टर्मिनल विकसित करण्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची भूमिका असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेले भूखंड बदलले तर वाहतूकदार प्रखर विरोध करतील, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आयमा संघटनेच्या वतीने औद्योगिक वसाहतीच्या बाहेरील जागेत ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे, अशी भूमिका मांडली. या भूमिकेला नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनल हे वसाहतीच्या मध्यवर्ती ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानुसार भूखंड राखीव करण्यात आलेला आहे. राखीव भूखंडाला लगत दोन मोठे रस्ते असून दोन्ही बाजूने जाण्या-येण्याची व्यवस्था आहे. आवश्यक त्या सर्व सुविधा या याठिकाणी होऊ शकतात. राखीव ठेवलेला भूखंड बदलले तर वाहतूकदारांचा याला विरोध राहील. त्या राखीव भूखंडावर ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे, अशी स्पष्ट भूमिका राजेंद्र फड यांनी मांडली आहे. या बैठकीत आमदार सीमा हिरे, प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, आयमा संघटनेचे अध्यक्ष वरुण तलवार, धनंजय बेळे व कार्यकारी अभियंता यांच्यासह नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सल्लागार प्रदीप जोहर, सचिव शंकर धनावडे उपस्थित होते.