नाशिक : त्र्यंबकेश्वरमधील पुरोहित वर्ग आयकर विभागाच्या रडारवर कायम असून, आज बुधवारीदेखील (दि. २८) छापेसत्र कायम होते. दरम्यान, आयकर विभागाच्या आजच्या छापेसत्रात सोने तसेच रोकड मोठ्या प्रमाणात जप्त केल्याची जोरदार चर्चा सुरू असली तरी यास दुजोरा मात्र मिळू शकला नाही. नोटाबंदीनंतर बँकांमध्ये अचानक रक्कम भरण्यात वाढ झाल्याने त्र्यंबकेश्वरमधील पुरोहित वर्ग गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाच्या रडारवर आला आहे़ आयकर विभागाने गेल्या चार दिवसांपासून तपासणीसत्र आरंभल्याने अनेकांचे धाबे दणाणल्याचे सांगण्यात येते. आयकर विभागाने आत्तापर्यंत दोघांकडे छापे घातले असून, नऊ पुरोहितांना संपत्तीचे विवरण देण्यासाठी नोटिसादेखील बजावण्यात आल्या आहेत़ शनिवारपासून त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेली ही कारवाई बुधवारीही सुरूच होती़ आयकर विभागाने ७२ तासांपेक्षा जादा काळ केलेल्या चौकशीत कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली. तपासणीत काही पुरोहितांकडे बेहिशेबी संपत्ती व महागड्या गाड्यांचा ताफा आढळून आल्याचे वृत्त आहे. (प्रतिनिधी)पौरोहित्याशिवाय इतर व्यवसाय करणाऱ्यांची ती चौकशी होती, त्यामुळे पुरोहितांनी घाबरून जाण्याचे कारण नाही़ पुरोहित संघाला बदनाम करून भाविकांची दिशाभूल केली जात आहे़ जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्रद्धेने त्र्यंबकेश्वरला येऊन विविध प्रकारचे पूजाविधी करतात़ त्यांना फायदा वा फळनिष्पत्ती होते म्हणूनच ते येतात़ पुरोहितांकडून कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली जात नाही़ १९९६ पासून त्र्यंबकेश्वरमधील पुरोहित रीतसर कर भरतात़ केवळ दहा - वीस टक्के पुरोहित कर भरत नाहीत. नोटाबंदीचे समर्थनही पुरोहितवर्गाने केले असून, आता कॅशलेसकडे वाटचाल सुरू झाली आहे़ - प्रशांत गायधनी, अध्यक्ष, पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकमधील छाप्यात हाती लागले मोठे घबाड
By admin | Published: December 29, 2016 12:30 AM