नाशिक : नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये व मालेगावच्या सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशीन दाखल झाले आहे. या मशीनवर कोरोना रुग्णाच्या नमुन्यांची प्राथमिक चाचणी करण्यात येणार असून, आयसीएमआर या राष्टय संस्थेकडून चाचण्या सुरू करण्याचे आदेश मिळताक्षणी नुमन्यांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात येणार आहे.सध्य:स्थितीत नाशिक शहरातील बाधितांच्या किंवा अन्य उपचारांसाठीदेखील दाखल होणाऱ्या कोविड संशयितांच्या नमुन्यांची तपासणी पुण्याच्या प्रयोगशाळेत तर मालेगावच्या संशयितांची तपासणी धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड तपासणी केंद्रात केली जाते. क्षयरोग विभागाकडून या दोन मशीन्सना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरकडे सुपुर्द करण्यात येणार होते. परंतु, नागपूरपेक्षा नाशिक शहर आणि जिल्ह्याची स्थिती अधिक बिकट असल्याचे यंत्रणेच्या लक्षात आले. त्यामुळे नाशिक आणि मालेगाव शहराच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून हे ट्रुनॅट मशीन नाशिकच्या दोन रुग्णालयांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या मशीनवरील चाचण्यांची नोंददेखील आयसीएमआरच्या साइटवर केली जाते.इन्फोएकावेळी दोन चाचण्याट्रुनॅट मशीन हे एकाचवेळी दोन रुग्णांच्या थुंकीच्या नमुन्यांची चाचणी करता येते. साधारणपणे दीड तासात दोन्ही चाचणीचा अहवाल मिळू शकतो. दाट संशयित किंवा एखादा अन्य आजाराने बाधित मात्र त्या उपचारापूर्वी कोरोना निगेटिव्ह टेस्ट मिळणे अपेक्षित असलेल्या रुग्णांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे आता दिवसभराच्या कामकाजाच्या वेळेत डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात २४ ते २६ चाचण्या आणि तेवढ्याच चाचण्या मालेगावच्या सामान्य रुग्णालयातील तपासणी केंद्रात होऊ शकणार आहेत.टीबीचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या गेलेल्या सीबीनॅट आणि ट्रुनॅट मशीनमध्ये काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. कोविड तपासणीसाठी त्यात वेगळे सॉफ्टवेअर आणि चीप बसवण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीच्या डीएनएनचे अॅँप्लिफिकेशन करून तो विषाणू आहे की नाही ते मशीन शोधून काढते. त्यातील किटदेखील सज्ज करण्यात आले असून, आयसीएमआर या कोविडबाबतच्या राष्टय संस्थेकडून त्याबाबतचा हिरवा कंदील मिळताच चाचण्यांना नाशिकमध्ये प्रारंभ करण्यात येणार आहे.