सिद्धटेक : चिंचवड देवस्थानचे विश्वस्त भाविकांना सुविधा न देता केवळ येथे जमा होणारा निधी चिंचवडला नेतात. भाविकांच्या मूलभूत सुविधांना अग्रस्थानी ठेवत रविवारी ग्रामस्थांनी विश्वस्तांना फैलावर घेतले. मंदिर व्यवस्थापनामध्ये होत असलेल्या हलगर्जीपणामुळे आक्रमक झालेले ग्रामस्थ व चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये हमरीतुमरी उडाली. सिध्दटेक (ता. कर्जत) येथील सिद्धीविनायक मंदिराचे व्यवस्थापन चिंचवड येथील चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने केले जाते. तीर्थक्षेत्र असताना येथे भाविकांसाठी त्यातुलनेत सुविधा नसल्यामुळे या प्रश्नांवरुन ग्रामस्थांनी विश्वस्तांना घेरले. व्यवस्थापनासाठी देवस्थान ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याबरोबरच मंदिरातील दानपेट्यांमधील जमा झालेल्या देणग्यांचा उपयोग येथील कामांसाठी केला जात नाही. मंदिर परिसरात कायमच अंधार असतो. शुद्धीकरण प्रकल्प असूनही अनेक दिवसांपासून भाविकांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळत नाही. मंदिर परिसरात स्वच्छता नसते, नदीपात्रात पाणी असतानाही मंदिराबाहेरील पाण्याच्या टाक्या कायमच रिकाम्या असतात, स्वच्छतागृहाच्या वापरालाही शुल्क घेतले जाते, असे आरोप मारुती मोरे,तुकाराम लष्कर,दादा आतार तसेच ग्रामस्थांनी केले.(वार्ताहर)
ग्रामस्थांकडून विश्वस्त फैलावर
By admin | Published: October 17, 2016 12:42 AM