नाशिक : जेव्हा अनेक तरुण माझ्याकडे नोकरीसाठी येतात तेव्हा मी त्यांना, तुम्ही सांगा त्याठिकाणी शिफारस करतो, असे सांगून यापेक्षा स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करा. त्यात यशस्वी व्हा. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा. आज अनेक कारखाने बंद आहेत त्यामुळे उद्योगात पडलो असे न म्हणता उद्योगात यशस्वी होणार असे म्हणून वाटचाल करा, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.गंगापूररोड येथे वाणी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ‘उद्योगविश्व २०२०’ या कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी ते असे म्हणाले की, आज शंभर टक्के सहकारी साखर कारखाने बंद आहेत. तर खासगी साखर कारखाने सुरू आहेत. कारण सहकारी क्षेत्रावर व सहकार क्षेत्रावर अनेक बंधने आहेत. कुठला ना कुठला कर अथवा नियमावलीच्या माध्यमातून उद्योजकांच्या वाटेत राजकारणीच अडथळे निर्माण करतात. वास्तविक उद्योजकांसाठी सरकार ‘फॅसिलिटी’च्या भूमिकेत असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्र मासाठी यशस्वी उद्योजकांकडून उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले. महाबळेश्वर येथील सनराइस कॅन्डल्सचे भावेश भाटीया, सह्याद्री अॅग्राचे विलास शिंदे, वनलाइन वेलनेसच्या डॉ. रेखा चौधरी यांनी त्यांचे अनुभव कथन केले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष नितीन दहिवेलकर, संजय बागड, सरचिटणीस संजय दुसे, चिटणीस राजेंद्र कोठावदे, हर्षद चिंचोरे, हितेश देव, देवदत्त जायखेडकर, महेश पितृभक्त, प्रवीण अमृतकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले. तर योगेश राणे यांची उद्योगविश्वच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी योगेश राणे यांची ‘उद्योगविश्व’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.उद्योगविश्व पुरस्कार आर्किटेक्ट रवींद्र अमृतकर, डोंबिवलीतील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. मिलिंद शिरोडकर, पुण्यातील अभिनव ग्रुपचे संचालक श्यामकांत शेंडे यांना देण्यात आला. तर तरुण उद्योजक म्हणून बांधकाम व्यावसायिक अभय नेरकर यांना उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.