नाशिक - महापालिकेने इमारत बांधकामासंबंधी प्रीमिअम दरवाढीचा पाठविलेला प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रीमिअम दरवाढीस भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत विरोध दर्शविल्याने त्याच्या निषेधार्थ शहर परिसरातील शेतक-यांनी शुक्रवारी (दि.२२) तपोवनातील साधूग्राममध्ये एकत्र येत आंदोलन केले. यावेळी शेतक-यांनी आमदार फरांदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र शासनाने शासकीय दराच्या ४० टक्के प्रीमिअम दराने एफएसआय विकण्याची मुभा महापालिकेस दिल्याने परिणामी, आरक्षणाखाली जमिनी गेलेल्या शेतक-यांच्या टीडीआरचे मूल्य कोसळले आहे. त्यामुळे शेतकºयांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानंतर, महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र शासनाकडे ७० ते ८० टक्के प्रीमिअम दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविलेला आहे. दरम्यान, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नाशिक मध्यच्या भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सदर दरवाढीस विरोध करण्याची भूमिका घेत दरवाढीचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती. आमदार फरांदे यांनी घेतलेल्या या भूमिकेच्या विरोधात शहर व परिसरातील शेतक-यांनी एकत्र येत तपोवनातील साधूग्राममध्ये आंदोलन केले आणि आमदार फरांदे यांचा निषेध केला. ‘प्रीमिअम वाढवा, शेतकरी वाचवा’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. आंदोलनात, शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर, केरू पाटील, राजाराम बोराडे, सोमनाथ बोराडे, छबुराव नागरे, बाळासाहेब विधाते, जयंत अडसरे, संजय पाटील, समाधान जेजुरकर, सुनील काठे, कुंदन मौले, ताराबाई मौले, महेंद्र जाधव, हिराबाई दातीर, विमल दातीर, भारती सरनाईक आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.‘जोडे मारो’चा प्रयत्नशेतकरी आंदोलकांनी आमदार देवयानी फरांदे यांची फ्लेक्सवर प्रतिमाही सोबत आणली होती. यावेळी प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी करताच पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रतिमा ताब्यात घेतली. त्यामुळे आंदोलकांचा प्रयत्न फसला.
प्रीमिअम दरवाढीस विरोध करणा-या नाशकातील भाजपा आमदाराच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 2:36 PM
शेतक-यांकडून निषेध : मनपाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित
ठळक मुद्देआमदार फरांदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी हिवाळी अधिवेशनात नाशिक मध्यच्या भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सदर दरवाढीस विरोध करण्याची भूमिका घेत दरवाढीचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती