येवला : येवल्याचे भूमिपुत्र स्वतंत्र समराचे सेनानी तात्या टोपे यांचे येवल्यातील नियोजित स्मारक उचित जागी व्हावे यासाठी कार्य कर-ण्याचा निर्धार करीत स्थापन झालेल्या सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय नवनिर्माण समितीच्या बैठकीची दुसरी महत्त्वपूर्ण सभा विविध निर्णय घेत बुधवारी झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. किशोर पहिलवान होते. येवल्यात सेनापती तात्या टोपे यांचे साडेदहा कोटी रुपये खर्चाचे स्मारक नियोजित आहे. पाणीपुरवठा साठवण तलावाजवळील जागेवर हे स्मारक व्हावे असा ठराव पालिकेने केला आहे, परंतु पालिकेने प्रस्तावित केलेली ही जागा अडगळीची असल्याने हे स्मारक नाशिक-औरंगाबाद महामार्ग रस्त्यावरील स. नं. १५, १६, १९ अंगणगाव शिवारातील ३ हेक्टर ३५ आर या शासनाच्या जलसंपदा विभागाच्या जागी व्हावे असा आग्रह समितीसह समस्त येवलेकरांचा आहे.हे स्मारक नाशिक-औरंगाबाद महामार्गावर या जागी नियोजित स्मारक व्हावे यासाठी समितीने कंबर कसली आहे. जलसंपदा विभागाची स्मारकासाठी पुरेशी असणारी जागा नियोजित स्मारकासाठी घ्यावी, असा आग्रह धरण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांची नाशिक येथे भेट घेऊन त्यांच्याकडे आग्रही मागणी करणार आहे. साठवण तलावाजवळील नियोजित स्मारकाची जागा अत्यंत गैरसोयीची आहे, ही जागा बदलावी अशी येवला शहरवासीयांची अंतर्मनातील भावना पालकमंत्री यांच्या कानी घालावी, असे ठरले. समितीचे अध्यक्ष आनंद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. किशोर पहिलवान यांनी सेनापती तात्या टोपे यांचा धावता इतिहास व कार्य यासह नियोजित स्मारकाची जागा बदलाचा हेतू काय ? यासाठी जनप्रबोधन पत्र काढण्याची सूचना मांडली. नवीन फेरप्रस्ताव दाखल करताना देखभाल दुरु स्तीची तरतूद समाविष्ट करावी. येवल्यातील अन्य वस्तूसारखी स्मारकाची दुर्दशा व्हायला नको. सार्वजनिक बांधकाम खात्याला देखभाल दुरुस्तीचे नियोजन असावे यासाठी प्रयत्न करायला हवा, असे माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी यांनी सांगितले. सुनील सस्कर यांनी सेनापती यांच्या जन्मस्थळी गंगादरवाजा भागात प्रवेशद्वाराला स्वागत कमान करावी अशी सूचना मांडली. सूत्रसंचालन गणेश खळेकर यांनी केले. बैठकीस राहुल लोणारी, संजय सोमासे, दिनेश परदेशी, नाना लहरे, अविनाश पाटील, दत्ता महाले, मयूर कायस्थ, रवि शिंदे, मीननाथ शिंदे, राजेंद्र मोहरे, बडा शिंदे, वीरेंद्र मोहरे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.येवल्यात हजार वृक्षांचे रोपणजलसंपदा विभागाच्या येवल्यातील कार्यालयाला मिनी सचिवालयात स्वतंत्र कक्ष उभा राहत असल्याने सध्याची पालखेड कॉलनीची जागा रिकामी होणार असल्याने या जागेची गरज जलसंपदा विभागाला नसेल. या जागेच्या बदल्यात जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांना घरे बांधून देता येतील. जलसंपदा विभागाच्या वास्तूचे मालमत्ता कर कायमस्वरूपी माफ करता येतील. नियोजित स्मारकाची जागा साठवण तलावालगत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीटंचाई निवारण करण्यासाठी आगामी वाढीव पाणीपुरवठा टप्प्यासाठी ही जागा लागणार आहे. त्यामुळे नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर जलसंपदा विभागाच्या जागी स्मारक उभे राहणे उचित आहे. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर स्मारक झाल्यास आणि येथे सुमारे एक हजार झाडे उभी राहिल्यावर शहराचे आरोग्यदेखील सुधारण्यास मदत होणार आहे, असा या बैठकीत सूर निघाला.
नियोजित सेनापती तात्या टोपे स्मारकाचीजागा बदलासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:12 AM