नाशिक : दुचाकी वाहनांचे सुटे भाग विक्रीच्या सारडा सर्कलवरील एका व्यावसायिकाच्या दुकानाच्या नावाने तब्बल ८ लाख ६० हजार ८२९ रुपयांची बनावटे बिले तयार क रून संशयिताने सदर व्यावसायिकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १ एप्रिल २०१२ ते २८ सप्टेंबर २०१७ या कालावधीपर्यंत संशयित निरज नरेंद्र वर्मा (४३, रा. कॉलेजरोड) याने फिर्यादी योगेश सीताराम जाधव (४३, इंदिरानगर) यांच्या दुकानाच्या नावाने तब्बल आठ लाख साठ हजार रुपयांच्या माल खरेदी केल्याचे खोटे बिले तयार करून फसवणूक क रण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादी जाधव यांनी म्हटले आहे. वेळोवेळी वर्मा याने जाधव यांच्या दुकानाच्या नावाने मालविक्रीचे खोटे बिले तयार केले. या बिलांवर सही व शिक्के घेण्यासाठी एका अज्ञात मुलास दुकानामध्ये पाठविले असता सदर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित वर्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित वर्मा हा महापालिकेचा ठेकेदार असल्याचा संशय सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी प्राप्त झालेल्या बनावट बिलांची शहानिशा सुरू असून, तपासामध्ये पुराव्यावरून संशयितावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर करीत आहेत.
आठ लाखांचे बनावट बिले तयार करुन व्यावसायिकाच्या फसवणूकीचा नाशकात प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 10:12 PM