नाशिक : राज्य सरकारने बंदीतून वगळलेल्या प्रतीच्या प्लास्टिकच्या पिशव्या असलेल्या व्यापाऱ्यांवरही महापालिकेच्या अधिकाराऱ्यांकडून कारवाई होत असून, अशा प्रकारे प्लास्टिकबंदीची कारवाई करून व्यापारी व्यावसायिकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. नाशिक शहरातील कोणताही व्यापारी प्लास्टिकबंदी विरोधात नाही. परंतु, शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे अधिकारी व्यापाऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांच्या जागृतीऐवजी कारावाई करीत असल्याचा आरोप उद्योग व्यावसायिकांनी केला आहे. शासन निर्णयानुसार पुनर्वापर व पुनर्प्रकियेबाबत (रिसायकल) स्पष्ट मार्गदर्शक सूचना मुद्रित असलेल्या वस्तुंच्या उत्पादनाच्या ठिकाणी उत्पादनाच्या प्रक्रियेदरम्यान अनिवार्य वेस्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक आवरण अथवा पिशवी प्लास्टिकबंदीतून वगळण्यात आलेली आहे. परंतु, शहरातील अनेक दुकानांमध्ये प्लास्टिकबंदीचा निर्णय अस्तित्वात येण्यापूर्वीचा माल असून, अशा मालाला पुनर्वापर करता येणाऱ्यां प्लास्टिकचे आवरण अथवा पिशव्या असल्यामुळे त्यावर पुनर्वापर व पुनर्प्रकिया (रिसायकल) करता येण्याबाबतच्या स्पष्ट सूचना नाहीत. ही व्यापाऱ्यांची तांत्रिक अडचण असून, त्याविषयी व्यापाºयांमध्ये जनजागृतीची आवश्यकता असताना प्लास्टिकबंदीची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मात्र सरसकट कारवाई करून दंडवसूल करण्यात येत असून, अशाप्रकारची कारवाई अन्यायकारक असल्याचे आरोप नाशिकच्या व्यापाऱ्यांनी केला आहे.
शहरातील अनेक कापड व्यावसायिकांसह विविध वस्तुंच्या दुकानांमध्ये गेल्या वर्षभरापासून आलेला माल असून, तो ५० मायक्रॉनपेक्षा अधिक प्रतीच्या पिशव्यांमध्ये असून, या पिशव्या शासन निर्णयातील निकषांनुसार पुनर्वापर व पुनर्प्रक्रियाबाबत (रिसायकल) होणाऱ्या आहेत. परंतु, केवळ यासंदर्भातील सूचना त्यावर मुद्रित नसल्याने व्यापाऱ्यांवर कारवाई करून दंड आकारण्यात येत आहे. हा व्यापाऱ्यांवर होणारा अन्याय असून, या कारवाईतून व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. -संजय सोनवणे, अध्यक्ष, मोटर मर्चंट असोसिएशन, नाशिक