धनंजय रिसोडकर, नाशिक: पुणे येथे झालेली ५४ वी आंतरजिल्हा व ८५ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्ह्याच्या टेबल टेनिसपटूंनी पदकांची लयलूट करत ५ सुवर्ण पदक तर ६ रजत पदकांची कमाई केली.
१९ वर्षाखालील मुलींच्या गटाच्या सांघिक स्पर्धेत नाशिकच्या मुलींच्या संघाने अंतिम फेरीत संघाने टीएसटीटीए मुंबईच्या संघाचा ३-१ पराभव करत सुवर्णपदक पटकावले. महिला संघाची सांघिक स्पर्धेत अंतिम फेरीत गाठ टीएसटीटीए मुंबईच्या बरोबर पडली. त्या सामन्यात नासिक संघाला १-३ ने पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. नाशिकच्या १९ वर्षाखालील मुली व महिला संघात सायली वाणी, तनिशा कोटेचा व मिताली पुरकर यांचा समावेश होता. अशा रीतीने नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघाने सांघिक स्पर्धेत तीन सुवर्ण तर तीन रजत पदक पटकावले. प्रशिक्षक जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलींनी उल्लेखनीय कामगिरी केली.
१९ वर्षाखालील मुलींच्या एकेरीत नासिकच्या तनिशा कोटेचा हीची गाठ सातवे मानांकन असलेल्या नासिकच्याच सायली वाणी हिच्याशी पडली. अंतिम फेरीत १२ वे मानांकन असलेल्या तनिशाने सायली वाणीचा ११-५, ११-८, ८-११, ११-८ व ११-५ असा ४-१ ने पराभव करून राज्य अजिंक्यपद मिळवित सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे सायलीला उपविजेतेपद मिळाले. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात पहिले मानांकन असलेल्या नासिकच्या कुशल चोपडा याने अंतिम फेरीत टीएसटीटीए मुंबईच्या तिसऱ्या मानांकित शर्वेय सामंत याचा १४-१२, ११-१३, ११-६ व ११-५ असा ३-१ ने सहज पराभव करून या गटाचा स्टेट चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. १९ वर्षाच्याखालील मुलांच्या गटामधे अंतिम फेरीत पाचवे मानांकन असलेल्या नाशिकच्या कुशल चोपडा याची टीएसटीटीए मुंबईच्या सहाव्या मानांकित जश मोदी यांच्याशी पडली.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात जश मोदीने कुशलवर ११-७, ८-११, ११-७, ११-८, ११-४ असा ४-१ ने पराभव करून विजेतेपद मिळविले. त्यामुळे कुशलला उपविजेते पदावर समाधान मानावे लागल्याने रौप्यपदक पटकावले. महिला एकेरीत नाशिकच्याच दहाव्या मानांकित सायली वाणीला जेनिफर वर्गीसकडून ४-३ ने पराभव पत्करावा लागल्याने सायलीला राज्य उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.