नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या घरी चांदीच्या गणपतीची पूजा करण्यात येते. प्रशासकीय सेवेतील सुरुवातीच्या म्हणजेच प्रोबेशनरी काळात मुंढेंनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे धाडसी अतिक्रमण हटाव मोहिम राबवली होती. या अतिक्रमणावेळी कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या दबावाला न जुमानता मुंढेंनी ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली. या मोहिमेवर खुश होऊन काही सज्ञान नागरिकांनी मुंढेंना चांदीचा गणपती भेट दिला होता. तेव्हापासून आजपर्यंत मुंढेंच्या घरी या गणपतीची मनोभावे पूजा केली जाते.
बार्शीकरांनी भेट दिलेल्या गणपतीच्या मूर्तीची मुंढेंनी आपल्या घरी स्थापना केली आहे. त्याशेजारीच दरवर्षी ते गणेश चतुर्थीच्या गणपतीची प्रतिष्ठापणा करतात. मुंढेंच्या पत्नी दहा दिवस न चुकता गोड नैवैद्य या बाप्पासाठी करतात. गणपतीमुळे सकारात्मक उर्जा मिळते. घरातील वातावरण आनंदी राहते, मुलेही खुश होतात. एरव्ही ते जमत नाही. मात्र, आजपासुन दहा दिवस न चुकता सात वाजता आरतीसाठी घरी येणार आहे, असे मुंढेंनी आज गणपतीची पूजा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हातात घेताच, तुकाराम मुंढें यांनी देवदेवतांचे फोटो कार्यालयात न लावण्याचे फर्मान काढले होते. त्यामुळे तुकाराम मुंढेंची एक वेगळीच भीती कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, आज चक्क तुकाराम मुंढेंनी नाशिक येथील महापालिका आयुक्त कार्यालयात गणपती बाप्पांची प्राण-प्रतिष्ठा केली. त्यानंतर सहकुटुंब आरतीही करण्यात आली. तर घरातही गणपतीची प्राण-प्रतििष्ठा केली असून गणपती सकारात्मक ऊर्जा देतो, असे ते म्हणाले.