नाशिक - नाशिक महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) सकाळी बरोबर दहाच्या ठोक्याला महापालिका मुख्यालय गाठत शिस्तबद्धतेचे दर्शन घडवत आपल्या आगामी कारभाराचे संकेतही दिले. कर्मचारी-अधिकारी येण्यापूर्वीच आयुक्त मुख्यालयात दाखल झाल्याने अनेकांची धावपळ उडाली. महापालिकेचे मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
शुक्रवारी (दि.९) सकाळी बरोबर दहा वाजता तुकाराम मुंढे यांनी महापालिका मुख्यालय असलेले राजीव गांधी भवन गाठले आणि आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंढे यांनी मुख्यालयात प्रवेश करतानाच आसपासच्या दालनांची माहिती घेत ते पुढे गेले. महिला स्वच्छतागृहाचे दरवाजे उघडे दिसल्यानंतर त्यांनी ते बंद करण्याची सूचना केली तर लगतच पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुंढे यांनी अधिकारी-कर्मचारी दाखल होण्यापूर्वीच मुख्यालयात एण्ट्री केल्याने अधिकाºयांसह कर्मचा-यांची धावपळ सुरू झाली. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली.