नाशिक: आपल्या धडाकेबाज आणि निर्भीड कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी अवघ्या महिन्याभरातच नाशिक महानगरपालिकेतील सुस्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडबडून जागे केले आहे. मुंढे यांनी शुक्रवारी पालिकेच्या चार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम देत प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. या अधिकाऱ्यांवर अनियमत कारभाराचे आरोप आहेत. या सगळ्याबद्दल अधिकाऱ्यांना 10 दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत.
मुंढे यांनी 9 फेब्रुवारी रोजी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतली होती. त्यानंतर मुंढे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे प्रशासकीय साफसफाईला सुरुवात केली होती. अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांनी अनेक अधिकाऱ्यांवर धारेवर धरायला सुरुवात केली होती. यामुळे पुन्हा एकदा प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंढे यांनी कर्मचा-यांना मिळणा-या वैद्यकीय भत्त्यात कपात करण्याची तयारी सुरू केल्याने कर्मचारी संघटनांनीही आयुक्तांविरोधात दंड थोपटले होते. आयुक्तांकडून गेल्या काही दिवसात घेतल्या गेलेल्या निर्णयाविरुद्ध मान्यताप्राप्त म्युनिसिपल कर्मचारी-कामगार संघटना एकवटल्या असून त्याविरूद्ध एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने ४७८ सफाई कामगारांच्या बदल्या केल्यानंतर सर्व संघटनांनी एकत्र येत त्याविरूद्ध आवाज उठविल्याने प्रशासनाला एक पाऊल मागे घ्यावे लागले आणि १६८ महिला सफाई कर्मचा-यांच्या बदल्या रद्द कराव्या लागल्या होत्या.