नाशिक - महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर राज्यशासनाने बदली केली असून त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे. मुंढे यांची मात्र अन्यत्र नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्या बदलीसाठीचे प्रयत्न आणि अन्य चर्चा होत होत्या. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंढे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील्याने आमदारांसह महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न करूनही उपयोग होत नव्हता. दरम्यान आता फडणवीस यांनीच वरदहस्त काढून घेतल्याने मुंढे यांची बदली झाली आहे. महापालिकेतील नगरसेवक आणि अधिका-यांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी मुंढे समर्थक नागरीकांची बैठक गुरूवारी सायंकाळी होणार असून त्यामाध्यमातून आंदोलनाची तयारी देखील सुरू झाली आहे.
सोलापुर, नवी मुंबई आणि पुणे परिवहन समिती अशा विविध ठिकाणी आपल्या अनेक निर्णयांनी वादग्रस्त ठरल्यानंतर मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी ८ नोव्हेंबर रोजी बदली झाली होती. नाशिक महापालिकेत ८ फेबु्रवारी रोजी सुत्रे स्विकारणा-या तुकाराम मुंढे यांच्या कायद्यावर बोट ठेवून काम करण्याचा फटका लोकप्रतिनिधींना बसला आणि त्यातून त्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीला सुरूवात झाली. महापालिकेने संमत केलेले अडीचशे कोटी रूपयांची कामे रद्द करण्यावरून पहिली ठिणगी पडली आणि त्यानंतर नगरसेवक निधी रद्द करणे, अगोदरच्या आयुक्तांनी मंजुर केलेली कामे रद्द करणे, करवाढ करणे यासारख्या वादांची भर पडत गेली.
१ मार्च पासून त्यांनी वार्षिक भाडेमुल्यात सुधारणा करताना हरीत पट्यासह पार्कींग आणि अन्य मोकळ्या जागांवर करवाढ केल्याने शहरात आंदोलने पेटली होती करवाढ रद्द करण्याचा एकमुखी ठराव करूनही आयुक्तांनी हा विषयाला बाजुला सारल्याने वादाचा कळस गाठला गेला आणि नाशिक महापालिकेत मुंढे यांच्याविरूध्द अविश्वास ठराव दाखल करण्याची ऐतिहासीक घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे ही नामुष्की टळली असली तरी त्यांच्यावर बदलीची टांगती तलवार होती. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून बदलीची चर्चा सुरू होती. अखेरीस ती खरी ठरली.