नाशिक - नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याने त्यांच्या समर्थनासाठी रस्तावर उतरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना मुख्यालयात मुक्त प्रवेश देण्यात आला. त्यामुळे सुरक्षा मंडळाला दिलेले सुरक्षा व्यवस्थेचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. त्यावेळी मुंढे यांच्या बदलीविरोधात सरकार तसेच नगरसेवकांच्या निषेधाच्या घोषणा मुंढे समर्थक कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी त्यांना मुख्यालयात प्रवेश देण्यात आला. एरवी मनपाच्या प्रवेश द्वारावर मनपा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले किंवा नगरसेवकांनी आंदोलन केले तर प्रवेश दिला जात नाही. मात्र, मुंढे समर्थकांनी प्रवेश कसा मिळाला असा प्रश्न नगरसेवकांनी केला आणि प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर सभापतींनी सुरक्षा कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले. दरम्यान, मुंढेंच्या कार्यपद्धतीवर नाखुष असलेल्या नगरसेवकांनी आणि भाजप समर्थकांनी मुंढेची बदली होताच, आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला. मात्र, नाशिककर जनतेला मुंढेंची बदली रुचली नसल्यानेच आपल्या नेत्यांविरुद्ध जाऊन नागरिकांनी मुंढेंच्या समर्थनात घोषणाबाजी केली. लोकप्रतिनीधींना नावडणारे मुंढे लोकांचे मात्र आवडते महापालिका आयुक्त बनल्याचेच यावरुन दिसून येते.