नाशिक - महापालिकेची स्थायी समिती अस्तित्वात असतानाही थेट महासभेवर सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्याचा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अट्टहास सत्ताधारी भाजपाने धुडकावून लावला. मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपाने नियम आणि परंपरेनुसार अंदाजपत्रक अगोदर स्थायीवर सादर करण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर करण्याचे आदेशित केले. यावेळी, आयुक्तांना निवेदन करू देण्याची विनंती महापौरांनी फेटाळल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद बोलवत नरमाईची भूमिका घेतली आणि संघर्ष टाळण्यासाठी आपण लवकरच स्थायी समितीवर अंदाजपत्रक सादर करणार असल्याचे स्पष्ट केले.महापालिकेच्या महासभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सन २०१७-१८ चे सुधारित आणि सन २०१८-१९ चे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. परंतु, अंदाजपत्रक महापौरांकडे सादर करण्यापूर्वीच भाजपाचे गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी कायदेशिरदृष्टया आणि परंपरा पाहता स्थायी समितीचे हक्क व अधिकार डावलून थेट महासभेवर अंदाजपत्रक सादर करणे चुकीचे ठरेल, अशी भूमिका घेतली. यावेळी, मोरुस्कर यांनी आयुक्तांनी विभागीय आयुक्तांसह नगरसचिवांना दिलेल्या वेगवेगळ्या पत्रातील विरोधाभासही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. सद्यस्थितीत स्थायी समिती गठित झालेली असताना आयुक्तांना महाराष्ट महापालिका अधिनियम कलम ३५(अ)नुसार सदर अंदाजपत्रक थेट महासभेला सादर करताच येऊ शकत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. याबाबत आयुक्तांना त्यांचे म्हणणे मांडू देण्याची मागणी विरोधकांनी केली. परंतु, महापौरांनी विरोधकांची ही मागणी मान्य न करता सदर अंदाजपत्रक हे स्थायीवर परत पाठविण्याचे आदेशित केले . महापौरांच्या या निर्णयामुळे विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. तुकाराम मुंढे आगे बढोच्या घोषणा देत विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला खिजविण्याचाही प्रयत्न केला. या गोंधळातच महापौरांनी सभा संपल्याचे जाहीर केले. महासभेनंतर सर्व विरोधकांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेतली.आयुक्त म्हणतात, संघर्ष नको!महासभेत भूमिका मांडू न दिल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला संघर्ष नको असून शहराच्या हितासाठी आपण लवकरच स्थायी समितीवर अंदाजपत्रक सादर करणार असल्याचे स्पष्ट केले. सदर अंदाजपत्रक हे महापौरांनी आदेशित केले म्हणून नव्हे तर आपण स्वत:हून हा निर्णय घेत स्थायीवर सादर करणार आहोत. त्याबाबतची तारीख ठरविली जाईल. तसेही ३१ मार्चच्या आत महासभेची मंजुरी न मिळाल्यास आयुक्तांचेच अंदाजपत्रक हे पुढे कायम राहते. परंतु, त्या भूमिकेत आपल्याला शिरायचे नसल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले.
तुकाराम मुंढे नरमले; अंदाजपत्रक अखेर ‘स्थायी’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 5:53 PM
महासभेत गदारोळ : सत्ताधारी भाजपाकडून मुंढेंची कोंडी
ठळक मुद्देस्थायी समिती अस्तित्वात असतानाही थेट महासभेवर सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्याचा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अट्टहास स्थायी समिती गठित झालेली असताना आयुक्तांना महाराष्ट महापालिका अधिनियम कलम ३५(अ)नुसार सदर अंदाजपत्रक थेट महासभेला सादर करताच येऊ शकत नसल्याचे स्पष्ट