नाशिक : महाराष्ट शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तलाठी महाभरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, दि. २ जुलैपासून शहरातील विविध सहा केंद्रांवर १८ दिवस परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील केवळ ६१ जागांसाठी सुमारे ३० हजारांच्या जवळपास अर्ज आल्याने परीक्षेचा कालावधी वाढला असून, एका केंद्रावर दररोज किमान १५० ते २०० विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठीचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्राप्त झाले आहे.गेल्या मार्च महिन्यात म्हणजे दि. १ मार्चपासून आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यासाठी राबविण्यात येणाºया या भरतीप्रक्रियेत विविध प्रवर्गातील एकूण ६१ जागांसाठी सदर परीक्षा घेण्यात येणार आहे. दि.२ ते २६ जुलै यादरम्यान परीक्षा होत आहे. शहरातील सपकाळ नॉलेज हब, अॅसेट अकॅडमी दिंडोरीरोड, डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट भोसला कॅम्पस, ब्लॉक अॅण्ड बुक्स स्कूल दिंडोरीरोड, व्ही. एन. नाईक पॉलिटेक्निक कॉलेज कॅनडा कॉर्नर आणि मातोश्री आसराबाई पॉलिटेक्निक एकलहरे येथे सदर परीक्षा घेतली जाणार आहे. सकाळी १० ते १२ आणि दुपारी २.३० ते ४.३० अशा दोन सत्रांत परीक्षा घेतली जाणार आहे.सर्वसाधारण गटासाठी २४, महिलांसाठी १९, खेळाडंूसाठी २, माजी सैनिकांसाठी ८, प्रकल्पग्रस्तांसाठी २ याप्रमाणे भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे. पाच टक्के पदे ही अपंगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. नाशिक जिल्हा अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रिक्त पदेदेखील या परीक्षेतून भरण्यात येणार आहेत. रिक्त असलेल्या १६ जागांमध्ये चार जागा खुल्या प्रवर्गासाठी, सात जागा महिलांना, एक जागा खेळाडू , तीन जागा माजी सैनिक तर एक जागा प्रकल्पग्रस्त याप्रमाणे असून, त्यानुसार ही महाभरती केली जाणार आहे. विशेष भरती मोहिमेंतर्गत शासनाने नाशिक जिल्ह्यातील रिक्त जागांसाठी या भरतीप्रक्रियेची जाहिरात दिली होती. अनुसूचित क्षेत्राबाहेरील आणि अनुसूचित क्षेत्रातील रिक्त पदांसाठी सदर भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे.असे असेल वेळापत्रकसकाळी १० ते १२, दुपारी २.३० ते ४.३० या कालावधीत सदर परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर १५० ते २०० उमेदवार परीक्षा देणार आहेत. सकाळ आणि दुपारच्या सत्रात परीक्षा देणाऱ्यांची संख्या तेवढीच असणार आहे. उमेदवारांनी परीक्षेच्या ९० मिनिटे आधी किंवा ३० मिनिटे अगोदर केंद्राच्या आवारात असावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात येणार असून, त्यानंतर आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे.
१८ दिवस चालणार तलाठी पदाची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:23 AM