नाशिक : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील ३६ व्यक्तींना ‘जीवन रक्षापदक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून, त्यात सिन्नर तालुक्यातील आगासखिंड येथील गोविंद लक्ष्मण तुपे यांच्यासह महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अनुमतीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे जीवन रक्षापदक पुरस्काराची मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीत घोेषणा करण्यात आली. त्यात गोविंद तुपे यांना ‘उत्तम जीवन रक्षापदक’ जाहीर करण्यात आले, तर तेजस ब्रिजलाल सोनवणे, मनोज सुधाकर बारहाते आणि नीलकांत रमेश हरिकांत्रा यांना जीवन रक्षापदक जाहीर करण्यात आले. देशातील ३६ नागरिकांना हे पुरस्कार जाहीर झाले असून, त्यातील सात व्यक्तींना मरणोत्तर जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार राशी असे आहे. राज्य शासनाच्या वतीने कालांतराने हे पुरस्कार प्रदान केले जातील. जिल्ह्यातील पहिलेच मानकरीनाशिक जिल्ह्याला अशा प्रकारचा हा पहिलाच पुरस्कार मिळाला असून, गोविंद तुपे हे सिन्नर तालुक्यातील आगासखिंड बेलू येथील रहिवासी आहे. पट्टीचे पोहणारे अशी त्यांची ख्याती असून, महापुरात बुडालेल्यांचा शोध घेणे व जीव वाचविण्यात हातखंडा असलेल्या तुपे यांनी ४७८ मृतदेह पाण्यातून बाहेर काढले तसेच १८ लोकांना पाण्यात बुडत असताना जीव धोक्यात घालून वाचविले आहे.
तुपे यांना राष्ट्रीय जीवन रक्षा पुरस्कार
By admin | Published: January 26, 2017 1:17 AM