पिंपळगाव बसवंत : महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी जी छत्रपतींची पगडी घातली, ती पिंपळगाव बसवंत येथील योगेश डिंगोरे या तरुणाने तयार केली आहे. मोदी यांनी याच पगडीचा सन्मानजनक उल्लेख करत त्यामुळे आपल्यावर छत्रपतींप्रती दायित्वाचे संकेत असल्याचे म्हटले होते.पंतप्रधान मोदी यांचे सभास्थळी आगमन झाल्यानंतर व्यासपीठावर उपस्थित उदयनराजे यांनी मोदी यांच्या डोक्यावर छत्रपतींची पगडी घालून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी यांनी पूर्णवेळ सभा संपेपर्यंत पगडी आपल्या डोक्यावर ठेवत भाषणही केले. सदर पगडी तयार करण्याचा मान पिंपळगाव बसवंत येथील योगेश डिंगोरे या कारागिराला मिळाला. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.१८) रात्री ११ वाजेच्या सुमारास डिंगोरे या फेटे व पगडी बनविणाºया कारागिराकडे उदयनराजे भोसले यांचे मेहुणे रत्नशीलराजे हे स्वत: गेले आणि त्यांनी पगडीची आॅर्डर दिली.डिंगोरे यांनीही हा बहुमान समजत रात्री अडीच वाजेपर्यंत मेहनत घेत पगडी तयार करून दिली. रत्नशीलराजे यांनीही या पगडीची प्रशंसाकरत डिंगोरे याच्या हाती २१०० रुपयांचे मानधन सोपविले शिवाय, उदयनराजे यांच्या भेटीसाठी आमंत्रणही दिले.सभेप्रसंगी मोदी यांनी सदर पगडी घालून तिच्याविषयी गौरवोद्गार काढले त्यावेळी डिंगोरे या कारागिराचाही ऊर भरून आला. मोदी यांनी सदर पगडीची इभ्रत कायम राखण्यासाठी आपण आपले पूर्ण जीवन समर्पित करू, अशी ग्वाही यावेळी दिली.
पिंपळगावच्या कारागिराने बनविली पगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 1:10 AM