उपनगर : कुंभमेळा पर्वात गोदावरी नदीकिनारी साकारण्यात आलेल्या घाटामुळे डोळे दीपले जात होते. मात्र आता त्या घाटावर गाळ, केरकचरा, घाण व नदीपात्रात सर्वत्र शेवाळ, पाणवेली तरंगत असल्याचे चित्र आहे. सिंहस्थ कुंभमेळा पर्वात गोदावरी नदीकिनारी पाटबंधारे विभागाकडून रामकुंड, गोदावरी-नंदीनी नदीसंगम तपोवन, दसक-पंचक, नांदूर-मानूर या ठिकाणी भव्य स्वरूपात घाट साकारण्यात आल्याने बघणाऱ्यांचे डोळे दिपून जात होते. मात्र आता त्या घाटाच्या सुरक्षितता व स्वच्छतेबाबत मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने घाटांची दिवसेंदिवस दुर्दशा होत आहे. गोदावरी-नंदीनी नदीसंगम तीरावर असलेल्या घाटाच्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गाळ, केरकचरा, प्लॅस्टिक पिशव्यांचा ढीग साचल्यामुळे अस्वच्छतेबरोबरच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तसेच नदीपात्रात उभारलेल्या लोखंडी रॅलिंगवर पाणवेली, घाण अडकून बसल्याने अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेली व शेवाळ तरंगत असल्याने नदीपात्रातील पाणी हिरवेगार दिसत आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे गोदामाईचा श्वास गुदमरत आहे. (वार्ताहर)
टाकळी घाटाची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2016 11:09 PM