सातपूर : गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याअभावी उद्योजकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याअभावी उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. उद्योग वाचविण्यासाठी दोन दिवसांत पाण्याचे आवर्तन सोडण्याची कळकळीची मागणी सिन्नरच्या त्रस्त उद्योजकांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांच्याकडे केली आहे.सिन्नर निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष अरु ण चव्हाणके, चिटणीस आशिष नहार, किरण जैन, मनीष रावळ, व्हीनस वाणी यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांच्या शिष्ठमंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांची भेट घेतली. धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी असल्यामुळे औद्योगिक वसाहतीत पाणी कपात करण्यात आली आहे. माळेगाव औद्योगिक वसाहत पाण्यामुळे ठप्प झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. आर्थिक उलाढाल मंदावली आहे. उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्याने बेरोजगारी वाढणार असून, पर्यायी नियोजन करून नियमाप्रमाणे उद्योगासाठीचे आरक्षित पाण्याचे आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी या उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता पी. आर. बंडूपीया, उपभियंता नरवाडे उपस्थित होते. याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी या उद्योजकांना दिल्याची माहिती निमा पदाधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)
पाण्याअभावी उद्योग अडचणीत
By admin | Published: May 28, 2016 10:54 PM