पंचवटी : पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयात चारचाकी वाहनांची हेडलाइट तपासणी केल्यानंतरदेखील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रात वाहने फेल दाखविल्याने गुरुवारी सकाळी संतप्त वाहनधारकांनी परिवहन कार्यालयातील स्वयंचलित यंत्रणा काहीकाळ बंद पाडली होती. अखेर घटनास्थळी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पाऊण तासानंतर स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र पुन्हा सुरू झाले. बुधवारी (दि.२०) काही वाहनधारकांनी चारचाकी वाहनांची तपासणी करण्यासाठी वाहने आणली होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिपत्याखाली वाहन दुरुस्ती केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याठिकाणी वाहनधारकांनी वाहनांचे हेडलाइट तपासणीची रक्कम भरून तीन वाहने पुन्हा स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रात आणली होती, मात्र त्यानंतरदेखील ३३ पैकी ३० वाहने फेल झाली. त्यानंतर संबंधित वाहनधारकांनी त्या दुरुस्ती केंद्रावर धाव घेतली असता दुरुस्ती केंद्रचालकाचे दुकान बंद असल्याचे बघून थेट प्रादेशिक परिवहन कार्यालयातील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र बंद पाडले. अखेर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतल्यानंतर पाऊण तास बंद असलेले स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र पुन्हा सुरू झाले. (वार्ताहर)
स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र पाडले बंद
By admin | Published: July 21, 2016 11:01 PM