नाशिक : पुणे-नाशिक हायवे व नाशिक-मुंबई हायवेवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच शिंदे व घोटी टोलमध्ये असलेली सदोष यंत्रणा याबाबत अनेकदा तक्रार करूनही वाहतूकदारांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसतील तर टोल का भरावा? असा प्रश्न उपस्थित करीत जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत नाही, तोपर्यंत टोल बंद करा, अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली असून शिंदे व घोटी टोल नाका येथील असुविधांविषयीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही तक्रार करण्यात आत्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली आहे.
नाशिक-पुणे हायवेवरील शिंदे-पळसे व नाशिक-मुंबई हायवेवरील घोटी टोल नाक्यावर वाहतूकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. टोलच्या ठिकाणी असलेली फास्टॅगची सुविधा अतिशय संथ व निष्क्रिय असून याठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. टोल ओलांडून जातानाच अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे वाहतूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. टोल परिसरात क्रेन, रुग्णवाहिका, यू-टर्नला बत्ती, रोडच्या कडेला सफेद पट्टा, स्वच्छतागृहांची स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असून याविषयी वारंवार तक्रारी देऊनही सुधारणा होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एकीकडे सोयी-सुविधा नसलेल्या रस्त्यावर टोल का भरावा? असा प्रश्न वाहतूकदारांपुढे निर्माण झालेला असताना दुसरीकडे टोलचा दर मात्र वाढतच असून ही एक प्रकारची वसुलीच असल्याचा आरोप ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केला आहे.
सदोष फास्टॅगच्या यंत्रणेमुळे माल वाहतूकदारांना स्कॅन न झाल्यास वाहने पुन्हा मागे घ्यावी लागतात. अशा वेळी मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. यासंदर्भात टोल नाक्यावर निवेदन देण्यास गेलो असताना प्रत्यक्ष असा प्रकार बघायला मिळाला. यावेळी वाहन मागे घेत असताना अपघात होऊन दोन गाड्यांचे नुकसान झाले. याचा फटकादेखील वाहतूकदारांना बसत असल्याने यंत्रणा सुधारण्याची वाहतूकदारांची मागणी आहे.
- राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन.