नाशिक : सरकारकडून अद्याप तूरदाळ आयातीबाबत कुठलीही पाऊले उचलली गेली नसल्यामुळे अद्याप राज्यासह शहरात तूरदाळीचा ऐन सणासुदीच्या काळात ‘भडका’ उडाला आहे. किरकोळ बाजारात फटका तूरदाळ १८०-१९० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. तूरदाळीच्या भाववाढीमुळे शहरातील सर्वच शाकाहारी हॉटेलमध्ये वरणाला महागाईचा ‘तडका’ दिला जात आहे. एकू णच नाशिककरांच्या स्वयंपाकगृहातील व्यवस्थापन तूरदाळीच्या भाववाढीमुळे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.शहरातील किरकोळ बाजारात मागील तीन दिवसांपासून तूरदाळ १८० ते १९० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक ली जात आहे. आठवडाभरापूर्वी किरकोळ बाजारात तूरदाळ १७० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे विक्री होत होती; मात्र आठ ते दहा दिवसांमध्ये तूरदाळीच्या भावात प्रतिकिलोमागे दहा ते पंधरा रुपयांची किरकोळ बाजारात वाढ झाल्याने नागरिकांना ऐन नवरात्रोत्सवात महागाईची झळ सोसावी लागणार असून, आगामी दसरा-दिवाळीमध्ये तुरीचा तडका सहन करावा लागणार आहे.महागाईच्या वाढत्या भडक्यामध्ये तूरदाळीचा ‘तडका’ सर्वसामान्यांना परवडेनासा झाल्याने सरकारी धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घाऊक व किरकोळ बाजारामध्ये जवळपास फटका तूरदाळ एकाच दराने उपलब्ध होत असल्याचे शहरातील किराणा व्यापाऱ्यांनी सांगितले. तूरदाळीच्या भाववाढीमुळे शहरातील सर्वच शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटपासून तर मोठ्या तारांकित रेस्टॉरंटपर्यंत दालतडका, दालफ्रायच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. काही रेस्टॉरंटमध्ये दालतडका, दालफ्रायचे दर अद्याप ‘जैसे थे’ असल्याचा दावा रेस्टॉरंट विक्रेत्यांनी केला असला तरी त्याची मागणी मात्र कमी होतांना दिसत आहे. तूरदाळीप्रमाणेच अन्य दाळींचे भावही वाढलेले दिसून येत आहेत. त्यातल्या त्यात हरभरादाळ त्यामानाने स्वस्त असलेली दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
किरकोळ बाजारात तूरदाळ @190
By admin | Published: October 19, 2015 10:20 PM