जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदी तुषार शेवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:33 AM2019-01-24T01:33:09+5:302019-01-24T01:33:26+5:30

नाशिक : देशपातळीवर कॉँग्रेसने प्रियंका गांधी यांना राजकारणात उतरवत धक्कातंत्र अवलंबिले असतानाच स्थानिक पातळीवरही बदल करण्यास सुरुवात केली असून, ...

 Tushar Shewale as District Congress President | जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदी तुषार शेवाळे

जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदी तुषार शेवाळे

googlenewsNext

नाशिक : देशपातळीवर कॉँग्रेसने प्रियंका गांधी यांना राजकारणात उतरवत धक्कातंत्र अवलंबिले असतानाच स्थानिक पातळीवरही बदल करण्यास सुरुवात केली असून, नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांना हटवत मविप्रचे अध्यक्ष आणि मालेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तब्बल १८ वर्षांनंतर जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदी बदल झालेला आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसने सत्ताधारी भाजपाला शह देण्यासाठी कंबर कसली आहे. 
सून बुधवारी (दि.२३) देशाच्या राजकारणात प्रियंका गांधी यांना उतरवत कॉँग्रेसने खळबळ उडवून दिली. जिल्हा स्तरावरही कॉँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी पक्षाने बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने नाशिक जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्षपद गेल्या अठरा वर्षांपासून भूषविणारे राजाराम पानगव्हाणे यांना हटवत त्यांच्या जागी मालेगाव तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती केली आहे. डॉ. शेवाळे हे जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था असलेल्या मविप्रचे अध्यक्ष असून त्यांनी जिल्हा परिषद सदस्यपदही भूषविलेले आहे. सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. नाशिक जिल्हा कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा गेल्या अठरा वर्षांपासून राजाराम पानगव्हाणे यांच्याकडे होती. दिवंगत गोपाळराव गुळवे यांच्या नंतर पानगव्हाणे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. मात्र, पानगव्हाणे यांच्या कारकीर्दीत कॉँग्रेसच्या वाट्याला सातत्याने पराभवच येत गेला. ग्रामीण भागातील पंचायत समित्यांवरीलही कॉँग्रेसची पकड ढिली होत गेली. त्यातूनच पानगव्हाणे यांच्याविरुद्ध नाराजी वाढत गेली. आमदारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी थेट राहुल गांधी यांच्याकडे गाºहाणे मांडत पानगव्हाणे यांना हटविण्यासंदर्भात विनंती केली होती. परंतु, अध्यक्षपदी बदल होत नव्हता. त्यामुळे कॉँग्रेसचे संघटन क्षीण होत गेले. अनेक कार्यकर्तेही कॉँग्रेसपासून दुरावले. आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी कॉँग्रेसने बाह्या सरसावल्या असून स्थानिक स्तरावरही बदलाचे वारे वाहू लागले आहेत.
कॉँग्रेसने देशपातळीवर प्रियंका गांधी यांना राजकारणात उतरवत विरोधकांना मोठा धक्का दिलेला आहे. देशस्तरावर बदल होत असतानाच पक्षाने मलाही जिल्हाध्यक्षपदाची भेट दिली आहे. मिळालेल्या या संधीचे मी नक्कीच सोने करेन. कॉँग्रेसचे संघटन तळागाळापर्यंत वाढविण्यासाठी झपाटल्यागत प्रयत्न केले जातील.   - डॉ. तुषार शेवाळे
मग उमेदवारीचे काय?
कॉँग्रेसने जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदी डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती करत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी सोपविली आहे. डॉ. तुषार शेवाळे हे धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत. पक्षाकडे तशी त्यांनी उमेदवारीची मागणीही केलेली आहे. त्यांच्या समर्थकांनीही उघडपणे त्यांनाच उमेदवारी दिली तरच निवडणुकीत पक्षाचे काम करण्याची तंबी दिली आहे. असे असताना आता शेवाळे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी सोपविल्याने शेवाळे उमेदवारी करणार की नाही, याबाबत तर्कवितर्क केले जाऊ लागले आहेत.

 

Web Title:  Tushar Shewale as District Congress President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.