नाशिक : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या ऑक्टोबर- नोव्हेबर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यान बारावीच्या लेखी परीक्षा होणार असून, १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोेबरदरम्यान दहावीची लेखी परीक्षा होणार असून, २१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागीय केंद्रातर्फे देण्यात आली आहे.
कोरोना संकटामुळे शिक्षण मंडळाला मागील शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीची मार्च २०२१ परीक्षा घेता आली नसली तरी मंडळाकडून ऑक्टोबमध्ये होणाऱ्या परीक्षा घेतल्या जाणार असून, त्यासाठी मंडळाने वेळापत्रकही जाहीर केले आहे. या परीक्षा कालावधीत विद्यार्थी, पालक , माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख व परीक्षा संचालनात कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय कार्यालये यांना परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्या तसेच परीक्षा कालावधीतील नैसर्गिक आपत्ती अथवा आपत्कालीन परिस्थितीत विषयी करण्याविषयीची व येणाऱ्या अडीअडचणींविषयी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक विभागीय मंडळातर्फे मदत वाहिनीही कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती विभागीय सचिवांनी दिली आहे.