नाशिक : कोरोना संसर्गामुळे गतवर्षी अनेकांना लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले होते. याहीवर्षी कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी जिल्ह्यात कोरोना नियमांचे पालन करत जवळपास साडेबारा हजार लग्नसोहळे उरकण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. गतवर्षी ऐन लग्नसराईत कोरोनाने पाय पसरले होते. त्यामुळे लग्नतारखा जाहीर झाल्यानंतरही अनेकांना लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले होते. त्यानंतर मध्यंतरी कोरोनाची रुणसंख्या कमी झाली होती. त्यामुळे पुन्हा लग्नसोहळे आयोजित करण्यात येत होते. मंगल कार्यालये बुकिंग करून ठेवले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. केवळ ५० नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली. ५० जणांना परवानगी असली तरी अनेक ठिकाणी शेकडो नातेवाइकांनी लग्नसोहळ्यास उपस्थिती लावली. ग्रामीण भागात तर धूमधडाक्यात लग्नसोहळे आयोजित करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास १२ हजार ५२५ लग्नसोहळे पार पडले असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात बहुतांश ठिकाणी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाची नजर चुकवून लग्नसोहळे आयोजित करण्यात आले. त्याचवेळी कोरोना नियमांचे पालनही करण्याचा प्रयत्न झाला.
१२४६ जोडप्यांनी केली विवाहाची नोंदणी
नाशिक येथील सह. दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालयातील विशेष विवाह अधिकारी यांच्याकडे गेल्या वर्षभरात ७१९ विशेष विवाहांची नोंदणी झाली तर १७६ जोडप्यांनी ‘फॉर्म १६’ भरून विवाहाची नोंद केली तर चालू वर्षाच आतापर्यंत २८६ विशेष विवाहांसह ६५ विवाहांची फॉर्म १६ अंतर्गत नोंदणी झाली असून कोरोनाच्या संकटात गेल्यावर्षापासून आतापर्यंत सुमारे १ हजार २४६ जोडप्यांनी उपनिबंधक कार्यालयात विवाहाची नोंद केली असून रजिस्टर पद्धतीने विवाहाकडे नागरिकांचा कल वाढत असल्याची माहिती विशेष विवाह अधिकारी संजय ठाकरे यांनी दिली.
तीन महिन्यांत ३१ विवाह मुहूर्त
जिल्ह्यात जवळपास १२ हजार ५२५ हजार विवाह झाले असले तरी अजूनही एप्रिल ते जून या महिन्यात ३१ विवाह मुहूर्त आहेत. त्यात एप्रिल महिन्यात २२, २४, २५.२६.२८.२९, ३० (७ मुहूर्त) मे महिना : १,२,३,४,५,८,१३, १५.२०,२१.२२,२४, २६. २८,३०, ३१
(१६ मुहूर्त) जून महिना : ४.६.१३,१६,२०,२६.२७,२८ (८ मुहूर्त) असे एकूण ३१ मुहूर्त आहेत.
एप्रिल महिना कठीण
जिल्ह्यात सध्या कोरोना आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही ठिकाणी लग्नसोहळे आयोजित करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना आजाराचा संसर्ग लक्षात घेता एप्रिल महिन्यात विवाह सोहळे आयोजित करणे कठीण असून अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.
विवाह उद्योगाला पाचशे कोटींचा फटका
नाशिक शहर परिसरात सुमारे तीनशे लॉन्स व मंगल कार्यालये आहेत. एका लॉन्सला एका हंगामात किमान शंभर विवाह सोहळ्यांचे आयोजन होते. त्यामुळे एका लाॅनचालकाची जवळपास ५ कोटींची उलाढाल ठप्प झाली असून नाशिकमधील कॅटरिंग, डेकोरेटर्स, बँड, किराणा या विविध घटकांसह विवाह उद्योगाला जवळपास पाचशे कोटींचा फटका बसला आहे. असे असतानाही लॉनचालकांचा कडक लॉकडाऊनला पाठिंबा असून गरज पडल्यास लॉन प्रशासनाला वापरासाठी देण्याची व्यावसायिकांची तयारी आहे.
- समाधान जेजूरकर, सह. सचिव, लॉन मंगल कार्यालय असोसिएशन चालक
---
कोरोनासारख्या आपत्तीमुळे पूर्ण व्यवसाय ठप्प झाला असून लॉन व मंगल कार्यालयांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन भरून द्यावा लागत आहे. अशा परिस्थितीतही लॉन व मंगल कार्यालये असोसिएशन्सने प्रशासनाला संपूर्ण सहकार्याची भूमिका घेतली असून शासनाने १५ दिवस अतिशय कडक निर्बंध लावावे. त्यामुळे येणाऱ्या काळात तरी काही विवाह सोहळे होऊ शकतील. त्यासाठी शासनाने कडक भूमिका घ्यावी, ही कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सुविधा पुरविण्याची असोसिएशनची तयारी आहे.
- सुनील चोपडा, अध्यक्ष, लॉन्स व मंगल कार्यालये असोसिएशन, नाशिक