नाशिक : महावितरणने शेतकऱ्यांच्या माथी दुप्पट वीज मारून सोयीस्कररीत्या दरवर्षीची होणारी १२ हजार कोटींची वीजचोरी व भ्रष्टाचार लपविण्याचा घाट घातला असून, या मनमानीला सरकारकडून चाप लावण्याचा प्रयत्न होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे रविवारी (दि. ९) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स राठी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.
महावितरण शेतकऱ्यांचा वीज वापर दुप्पट दाखवत असून, कंपनी शेतकरी व राज्य सरकार या दोघांचीही लूट करीत असून, सर्व शेती पंप वीज ग्राहकांनी प्रथम वीज बिले व थकबाकी दुरुस्तीसाठी तक्रार अर्ज दाखल करावेत. बिल दुरुस्तीनंतरच सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन होगाडे यांनी शेतीपंप वीज ग्राहकांना यावेळी केले. जाहीर सवलत योजनेप्रमाणे खरी बिले निश्चित करून ५०टक्के सवलत दिली, तर अंदाजे सहा हजार कोटी इतकीच रक्कम जमा होणार असून, या योजनेत पाच वर्षांचे व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळे व्याजासह वसुलीपात्र थकबाकी कमाल आठ ते नऊ हजार कोटी होऊ शकते असेही त्यांनी नमूद केले. यावेळी चेंबरचे मुकुंद माळी, वीज ग्राहक समितीचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ वर्मा, चेंबरचे पदाधिकारी कैलास आहेर, संजय राठी उपस्थित होते.
माहिती असूनही सरकारचा कानाडोळा
शेतीपंप वीज विक्री हे गळती, चोरी व भ्रष्टाचार लपविण्यासाठी सोयीस्कर ठिकाण असल्याचे नमूद करतानाच शेतीपंपांचा वीजवापर ३१ टक्के व वितरण गळती १५ टक्के आहे, असा दावा कंपनीने केला आहे. वस्तुस्थिती याउलट असून, शेती पंपांचा खरा वीजवापर १५ टक्के असून, गळती किमान ३० टक्के अथवा त्याहूनही अधिक आहे. याविषयी माहिती लपविली जात असल्याचा आरोपही होगाडे यांनी केला आहे.