नाशिक : घरात किडे, अळ्या येतात आणि फांद्याचा त्रास होतो, अशी नानाविध बिनबुडाची कारणे दाखवून काठे गल्ली परिसरात असलेल्या अक्षर इस्टेटच्या कॉलनी रस्त्यावरील दहा ते बारा वर्षे जुनी बदामाच्या सहा झाडांची कत्तल रहिवाशांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत या भागातील अक्षर इस्टेटच्या सी विंग मधील रहिवाशी वृक्षप्रेमी अरविंद निकुंभ यांनी महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तालयात अवैधरित्या वृक्षांची कत्तल करणाऱ्यांविरुध्द वृक्ष संरक्षण अधिनियम कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.२००४ साली निकुंभ यांच्या प्रयत्नाने काही वृक्षप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन या कॉलनी रस्त्यांलगत बदामाच्या झाडांचे वृक्षारोपण केले होते. या झाडांची वेळोवेळी काळजी घेऊन देखभाल करत त्यांचे संगोपन केल्याने झाडे चांगली बहरली होती. सर्व झाडांची दमदार वाढ झाल्यामुळे कॉलनीचा हा परिसर झाडांच्या सावलीखाली होता; मात्र काही रहिवाशांनी एकत्र येऊन परस्पर निर्णय घेत संगनमताने सहा झाडांची कत्तल केल्याने आता हा परिसर ओसाड बनला असून अक्षर इस्टेटमधील सावली हरविली असून निसर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत निकुंभ यांनी संताप व्यक्त केला आहे. हिरवीगार बहरलेली बारा वर्षे जुनी झाडे अवैधरित्या तोडण्याचा अधिकार रहिवाशांना कोणी दिला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एकूणच शहरात अवैधरित्या होणाऱ्या वृक्षतोडीकडे तसेच वृक्षांच्या बुंध्याजवळ केल्या जाणाऱ्या जाळपोळीकडे महापालिकेच्या उद्यान विभागाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बारा वर्षांची झाडे जमीनदोस्त : काठे गल्लीमधील सहा झाडांची कत्तल
By admin | Published: March 27, 2017 2:01 PM