नाशिक : शिक्षक पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (दि.१९)नाशिक जिल्ह्यातील ६१ परीक्षा केंद्रांवर २० हजार ९७५ उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. यात पहिली ते पाचवीच्या शिक्षक पदासाठी ३४ केंद्रांवर पेपर एकची सकाळच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. तर सहावी ते आठवी च्या शिक्षकपदासाठी दुपारच्या सत्रात २७ परीक्षा केंद्रांवर पेपर दोनची परीक्षा घेण्यात आली. यातील किरकोळ अपवाद वगळता सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. शिक्षक पात्रता परीक्षेतील पेपर एकसाठी जिल्हाभरातून ३४ केंद्रांवर एकूण १२ हजार ६७९ उमेदवार प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ११ हजार ६६५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. तर १ हजार १४ उमेदवारांनी या परीक्षेला दांडी मारली. पेपर दोनसाठी २७ केंद्रावर दुपारच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. यात एकूण प्रविष्ठ १० हजार १२९ पैकी ९ हजार ३१० परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर ८१९ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी संतोष झोले यांनी दिली. टीईटी परीक्षेसाठी शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी सूचनांनुसार ९ झोनल अधिकारी, ६१ सहायक परिक्षक व ६१ केंद्र संचालकांची नियुक्ती करण्यासोबतच त्यांना प्रश्नपत्रिका व परीक्षाविषयक सर्व साहित्याची गोपनीयता राखण्यासाठी तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणार नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक परीक्षा केंद्रावर सहाय्यक परीरक्षकांनी बैठे पथकाची भूमिका बजावत करडी नजर ठेवली. तसेच प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेसाठी परीक्षा परिषदेच्या सूचनांनुसार प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात आले. दरम्यान, शहरातील सीडीओ मेरी येथे तीन परीक्षार्थींना तर नवरचना विद्यालयातील केंद्रावर एका परीक्षार्थीला उशीर झाल्यामुळे परीक्षेला मुकावे लागले. परंतु परीक्षा परिषद व शिक्षण विभागाने सर्व परीक्षार्थींनी नियोजित वेळेच्या २० मिनिटे पूर्वीच परीक्षा कें द्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यामुळे उशीर झाल्याच्या कारणावरून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे शिक्षण विभागाने स्षष्ट केले आहे. शिक्षक पदासाठी चुरस डीएड अथवा बीएड उत्तीर्ण करूनही अनेक उमेदवारांना केवळ टीईटी उत्तीर्ण नसल्यामुळे ३१ डिसेंबरपासून नोकरी गमवावी लागली आहे. तसेच यापुढील शिक्षक भरतीसाठीही टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याने टीईटीला प्रविष्ठ परीक्षार्थींमध्ये शिक्षक पदासाठी चुरस दिसून आली.
शिक्षक होण्यासाठी वीस हजार उमेदवारांनी दिली टीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 6:49 PM