कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील सायखेडा येथे रायगड गल्लीत गुरुवारी (दि. २४) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकत सुमारे २४ आर्टिकल माल व एका चारचाकी वाहनासह २२ लाख ४३ हजार १९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सायखेडा गावातील रायगड गल्लीत संशयित अर्जुन भादेकर (वय २१) याच्या घरासमोरील गोडावूनवर छापा टाकला असता चार चारचाकी वाहनासह (एम एच १५ एच एच ०९९३) २२ लाख ४३ हजार १९२ रुपये किमतीचा सुगंधित मसाला व तंबाकू यांचा साठा आढळून आला. पथकाने सदर मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने राजेंद्र सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे. प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक केल्याप्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले असल्याची माहिती सायखेडा पोलिसांनी दिली.
साडेबावीस लाखांची तंबाखू सायखेड्यात जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 12:11 AM