सिन्नर फाटा येथील मल्टी मॉडेल हबमध्ये ट्विन टॉवर उभारण्यात येणार असून त्या ग्रीन बिल्डिंग असणार आहेत. तसेच परिसरात जीम, शॉपिंग माॅल पासून थेट थिएटर पर्यंत सर्व सुविधा असतील, आगामी पन्नास वर्षे टिकेल अशा पद्धतीचा हब तयार करण्यात येणार असून तशा सूचना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मंगळवारी (दि.२४) दिल्या आहेत.
मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब तयार करण्याबाबत मंगळवारी (दि.२४) नाशिक महापालिकेत बैठक घेण्यात आली. यावेळी महारेलचे वास्तुविशारद किरण काळे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. याठिकाणी वीस हजार चाैरस फुटाचे बांधकाम करण्यात येणार असून दोन ट्विन टॉवर बांधण्यात येतील. त्यात एकाच इमारतीमध्ये तीनही ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध असतील. यात
पहिल्या मजल्यावर रेल्वे, दुसऱ्या मजल्यावर बस तर, तिसऱ्या मजल्यावर मेट्रो असेल. निओ मेट्रो ही सुरुवातीला यात नसली तरी ती देखील याठिकाणीच येईल आणि प्रवाशांना पायी चालण्याच्या अंतरावर उपलब्ध असतील अशी रचना करण्याची सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी दिली. याठिकाणी केवळ ही तीन प्रमुख साधनेच नाही तर पॅरा ट्रांझीट म्हणजेच रिक्षा आणि टॅक्सीसारखी अन्य प्रवासी साधनांची देखील उपलब्धता असणार आहे. ट्रान्सपोर्ट हबच्या इमारतीमध्ये कमर्शिअल मॉल, कार पार्किंगची सुविधा असेल परंतु त्याचबरोबर प्रतीक्षा कालावधीत वेळ घालवण्यासाठी थिएटर, मॉल, जीम अशा सुविधा देखील असतील, असे सांगण्यात आले. तसेच या हबकडे म्हणजेच सिन्नर फाटा येथे जाणाऱ्या मार्गाचे स्पेशल रोड डिझायनिंग करून दीर्घकाळ रस्ता टिकावा अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
बैठकीस शहर अभियंता शिवकुमार वंजारी, शिवाजी चव्हाणके, राजू आहेर, संजय घुगे, बी. जी. माळी, रौंदळ, रवींद्र बागूल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
इन्फो... कन्सेप्ट नोट तयार करण्याचे आदेश
महारेलने उत्तम आराखडा तयार केला असला तरी विविध सूचना लक्षात घेऊन कन्सेप्ट नोट तयार करून ती निओ मेट्रोला सादर केल्यानंतर १० ते १५ सप्टेंबर दरम्यान महापालिका आयुक्त कैलास जाधव हे अन्य यंत्रणांशी व्हिडिओ कॉन्फरसिंग मिटिंग घेणार आहेत.