महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या महिन्यात ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडल्यानंतर त्यातील उणिवांबाबत चर्चा सुरू झाली हेाती. मात्र, एकीकडे उणिवा शोधतानाच दुसरीकडे असे घडूच नये यासाठी महापालिकेने विशेष नियोजन केल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
गेल्या वर्षी महापालिकेने बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाक्या बसवल्या. मात्र, अशी दुर्घटना घडले अशी कोणाला कल्पना नव्हती. मात्र, आता हा अपघात घडल्यानंतर महापालिकेने ए, बी आणि सी अशा तीन विकल्पांवर काम सुरू केले आहे. अशा प्रकारे एकच टाकी असताना दुर्घटना घडलीच तर रुग्णांना पर्यायी टाकीतून ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेने दोन्ही रुग्णालयांत तीन तीन केएलच्या दोन टाक्या बसवण्याची तयारी केली आहे. त्यासाठी फाउंडेेशनचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून लवकरच टाक्या बसवून त्यानंतर पेसो प्रमाणपत्रासाठी पेट्रोलियम मंत्रालयासाठी अर्ज करण्यात येणार आहे.
दुसरा भाग म्हणजे महापालिकेने दोन्ही रुग्णालयांत हवेतून ऑक्सिजन तयार करणारे प्रकल्प तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातील झाकीर हुसेन रुग्णालयात दोनशे तर बिटको रुग्णालय पाचशे जम्बो सिलिंडर भरणारे प्रकल्प असतील. याशिवाय पाचशे द्रवरूप ऑक्सिजन प्रकल्पदेखील साकारण्यात येणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनचे अनेक पर्याय उपलब्ध राहतील आणि अडचण उद्भवणार नाही, असे आयुक्तांनी सांगितले.
कोट...
महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर पर्यायी ऑक्सिजन पुरवठा असलेली यंत्रणा नव्हती. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर याठिकाणी अशी दुर्घटना घडलीच तर पर्यायी तात्काळ व्यवस्था व्हावी यासाठी ऑक्सिजन टाक्या बसविण्यात येत आहेत. त्यामुळे टाकी देखभाल दुरुस्तीसाठी काही काळ बंद ठेवणे शक्य होईल.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका
इन्फो...
महापालिकेने सध्या या टाक्यांच्या देखभालीचे काम आपल्या अभियंत्यावर देखील सोपवले आहे. महापालिकेचे स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने खासगी संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले असून सध्या या अभियंत्यांवर देखभालीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.