पंचवटी : पेठरोडवरील एसटी कार्यशाळेमधील जुन्या टायरच्या गुदामाला सोमवारी (दि.३०) रात्री लागलेल्या भीषण आगीत सुमारे १ हजार खराब टायर व पाचशे ट्यूबचे तुकडे भक्ष्यस्थानी पडले. या आगीत टायर-ट्यूबचे शेड जळून पूर्णपणे खाक झाले. या आगीची माहिती वेळीच मिळाल्याने व अग्निशमन दलाच्या जवानांनी कर्तव्यतत्परता दाखविल्यामुळे स्क्रॅप झालेल्या १००हून अधिक बसेस, १० मिनी बस, ५०हून अधिक आॅइलचे ड्रम सुरक्षितरीत्या आगीतून वाचविण्यास यश आले. या घटनेत राज्य परिवहन महामंडळाचे सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.पेठरोडवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची कार्यशाळा असून, या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील एसटी बसेसची दुरु स्ती केली जाते. सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानकपणे भंगार टायरच्या गुदामातून धूर व आगीच्या ज्वाला उठल्याचे दिसू लागले. काही वेळेतच आगीने रौद्रावतार धारण केला. यामुळे रात्रीच्या काळोखात कार्यशाळेचा संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, केंद्र अधिकारी राजेंद्र बैरागी, उपकेंद्रीय अधिकारी जे. एस. अहिरे, लिडिंग फायरमन श्याम राऊत यांच्यासह सर्व केंद्रांचे मिळून सुमारे २० ते २५ जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत सुमारे तीन तासांत आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश आले. यासाठी दहा बंबांचा वापर केला गेला. प्रादेशिक परिवहन विभागाने काही दिवसांपूर्वी जप्त केलेल्या वाहनांपैकी मारु ती व्हॅन व स्कूल बस अशा दोन वाहनांचे नुकसान झाले.
एसटी वर्कशॉपच्या आगीत अडीच लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 1:29 AM
पेठरोडवरील एसटी कार्यशाळेमधील जुन्या टायरच्या गुदामाला सोमवारी (दि.३०) रात्री लागलेल्या भीषण आगीत सुमारे १ हजार खराब टायर व पाचशे ट्यूबचे तुकडे भक्ष्यस्थानी पडले. या आगीत टायर-ट्यूबचे शेड जळून पूर्णपणे खाक झाले.
ठळक मुद्देटायर खाक : पाच तासांनी आग आटोक्यात