नाशिक : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) आणि सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (आरएनटीसीपी) अंतर्गत महापालिकेत कंत्राटी भरती प्रक्रिया राबविली जात असून, ७२ जागांसाठी २४९९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात सर्वाधिक अर्ज हे शिपाई पदासाठी आले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून महापालिकेमार्फत सदर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (सहा पदे), अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (आठ पदे), स्टाफ नर्स (सात पदे), फार्मासिस्ट (पाच पदे), डाटा एन्ट्री आॅपरेटर (आठ पदे), ए.एन.एम. (१५पदे), लॅब टेक्निशियन (सहा पदे), शिपाई (नऊ पदे), पूर्ण वेळ लेखापाल (एक पद), वरिष्ठ ट्रीटमेंट सुपरवायझर (दोन पदे), ट्युबरक्युलॉसिस हेल्थ व्हिजिटर (पाच पदे) याप्रमाणे पदसंख्या आहे. सर्व पदांसाठी महापालिकेने १३ आॅक्टोबरपर्यंत अर्ज मागविले होते. त्यानुसार, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी - ३०, अर्धवेळ वैद्यकीय पदासाठी - ३२, स्टाफ नर्स - ११५, फार्मासिस्ट - १७४, डाटा एन्ट्री आॅपरेटर - ३७३, ए.एन.एम. - २१७, लॅब टेक्निशियन - ७७, शिपाई - १०८०, पूर्णवेळ लेखापाल - ६०, वरिष्ठ ट्रीटमेंट सुपरवायझर - १५७, ट्युबरक्युलॉसिस हेल्थ व्हिजिटर - १८४ यानुसार एकूण ७२ जागांकरिता २४९९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दि. १८ ते २६ आॅक्टोबर या कालावधीत पदनिहाय मुलाखती घेतल्या जाणार असून, दि. १७ आॅक्टोबरला दुपारी २ वाजेनंतर पात्र उमेदवारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच राजीव गांधी भवन येथे प्रवेशद्वारावर प्रसिद्ध केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
७२ जागांसाठी अडीच हजार अर्ज
By admin | Published: October 15, 2016 2:40 AM