सातपूर : उद्योगांना आॅक्सिजन पुरवठा बंद केल्याने उद्योग विशेषत: स्टील उद्योग संकटात सापडला असून, कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे, तरी उद्योगांना किमान २० टक्के पुनर्भरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी निमाच्या वतीने उद्योगमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.जिल्'ात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, तर अत्यावश्यक रुग्णांना आॅक्सिजनची गरज लागते; परंतु आॅक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने आॅक्सिजन उत्पादन करणारे उत्पादक आणि पुरवठादारांनी उद्योगांना आॅक्सिजनचा पुरवठा तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे. कोविडमुळे उद्योग क्षेत्र संकटात सापडले आहे. उद्योग कसा चालवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास सर्वच इंजिनिअरिंग उद्योगांना आॅक्सिजनची गरज भासते. विशेषत: स्टील उद्योग आॅक्सिजनवर अवलंबून आहे. असे अडीच हजार स्टील उद्योग आॅक्सिजनमुळे अडचणीत आले असून, तेथील कामगारांचा रोजगार संकटात सापडला आहे. रुग्णांसाठी आॅक्सिजनचा पुरवठा करावा, त्याचप्रमाणे उद्योगांनादेखील किमान २० टक्के पुनर्भरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आणि उद्योगमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.